Back to feed
V
Vihaan Bhat Patriotic · Mixed · Patriotic

.. आठवणीतला शिक्षक दिन आणि आजचे दीन शिक्षक.. .. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला.. .. पणती जपून ठेवा, अंधार फार झाला.. .. .. आजही या पंक्ती, ही कविता आठवते.. त्याची ती लय, चाल, शब्द आणि मुलांनी ती समजून, उमजून गावी नुसती तोंड-पाठ करू नये म्हणून धडपडणारे माझे सर!!! सगळे सगळे आज अगदी जसेच्या-तसे आठवते.. .. आज काय निमित्त? अचानक शाळेतल्या सरांची आठवण वगैरे म्हणजे जरा अतीच नाही!!! पण, विद्येच्या या माहेरघरात आठवण करून द्यावी लागतीये की आज “शिक्षक दिन” आहे.. .. ५ सप्टेंबर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. एक दिवस असाही होता कि, शाळेतल्या शिक्षकांना आपण गुरुवर्य, गुरुजी, मास्तर आणि सर म्हणायचो. आजही म्हणतो, नाही असे नाही. पण या शब्दांमागचा आदरभाव कुठेतरी दूर लोपलाय. असो, हे असे सतत negative बोलून आता याचेही काही वाटेना झालंय. भूतकाळात रमायला कोणाला आवडत नाही आणि त्या भूतकाळापासून खूप काही शिकण्यासारखे असेत तर? आपल्या शिक्षकांना surpirse द्यायचे ठरवलेले तर आम्ही आदल्या दिवशी वर्गणी काढून प्रत्येक शिक्षकास नारळ, गुलाबाचे फूल आणि एक ऐरमेल च पेन द्यायचो तर कोणी कुठल्या शिक्षकांचा रोल play करायचा हेही आधीच ठरलेले. प्रत्येक आलेले सर आणि बाई आमचा तो उत्साह पाहून, ती कार्यक्रमाची शिस्तबद्ध आखणी पाहून थक्क होत. 30 वर्षापूर्वीचे ते संवाद आजही कानात आणि हृदयात घर करून आहेत. आजही स्पष्ट, लक्ख आठवतात ते सगळे चेहरे.. गणितातली ती वेडी वाकडी सूत्रे शिकवताना, पोरांची कुजबूज कानी पडली कि duster फेकून मारणारे सर.. भूगोलाचा नकाशा फळ्याबाहेर जातोय हे बघून “ आपला देश किती विस्तीर्ण आहे, महान आहे” सांगणारे ते सर.. भाषांतरे, श्लोक तोंडपाठ झालेच पाहिजे असा अट्टाहास धरणाऱ्या बाई.. .. विज्ञानातील रासायनिक अभिक्रिया झाल्यावर अमोनियमचा सडक्या अंड्याचा वास, सदाफुलीची नाजूकता .. मराठीतून इंग्रजी शिकवत आम्हाला इंग्रजीही तितकीच गोड आणि सोपी करून सांगणारे.. आम्ही केवळ परीक्षार्थी होवू नये तर, विद्यार्थी व्हावे म्हणून धडपडणारे ते पर्यवेक्षक सर आणि आम्हाला निदान ५०० मीटर तरी न दमता पळता यावे म्हणून उन्हा-तान्हात आमच्या बरोबर उभे राहणारे वर्षांचे आमचे PT चे सर.. .. खंत आज एकाच गोष्टीची वाटते, की माणुसकी, समाजवाद, प्रेम, आदर आणि आपुलकी यांच्या बाष्कळ चर्चा करणारे आपण, शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा आठवू शकत नाही आपल्या शिक्षकांना, आपले शिक्षक दीन होताना.. ..

171 likes 29 shares
WhatsApp