Back to feed
A
Avni Malhotra love · marathi · romantic

ऐक ना, एक न लिहिलेलं पत्र तुझ्यासाठी... तुला आठवतात का रे ते एकमेकांच्या प्रेमात भारलेले दिवस, त्या आकाशातल्या चांदण्यांसोबत स्वप्नांच्या रात्री आणि न बोलताही सगळं कळणाऱ्या संवादाच्या हळव्या जागा? किती काळाच्या अंतरानं भेटायचो आपण सगळ्या अडचणीतून रस्ता शोधत आणि तरीही मधलं अंतर पुसून निघायचं, गप्पा संपायच्याच नाहीत. नाटक, कविता, पाहिलेले, ऐकलेले कार्यक्रम, पुस्तकं... असंख्य विषय. मग तू आग्रह करायचास गाणं म्हणण्याचा. माझं गाणं आणि तुझ्या डोळ्यात कौतुक! निघताना आतून दाटून यायचं, गळा गच्च व्हायचा, तू तर गप्प गप्प व्हायचास! पुन्हा कधी भेट होईल हे कुठं माहीत असायचं? तुझ्या ओढीनं यायची भेटायला लांबून, त्या प्रत्येक वेळी तू माझा निरागसपणा जपलास. स्वातंत्र्याचा आदर राखलास. मी त्या सगळ्या क्षणांशी आजही कृतज्ञय! आपलं लग्न ठरलं तेव्हाची गोष्ट! हवीहवीशी वाटणारी आणि हुरहूर लावणारी कातरवेळ! सोबतीला हिरवा गारवा. आधी भरपूर बोलून हसलो होतो. एकमेकांच्या हातात हात गुंफून मौनाच्या भाषेत आपण रमलेलो. तू अचानक मला जवळ ओढलंस आणि ओठावर ओठ ठेवलेस. मला अगदीच अनपेक्षित होतं हे. क्षणभर कळलंच नाही काय होतंय ते. मात्र सगळं शरीर झंकारणारी सतार झालं. खूप काही घडत होतं आत. उसळत होत्या लाटा. एका नव्या अनामिक भावनेची ती पहिली ओळख. तुझ्या आतुरतेला दिलेला हळुवार प्रतिसाद नवखाच होता माझ्यासाठीही. सगळा भोवताल विसरून गेलो होतो, सगळं जग एकवटलं होतं त्या क्षणांत! घरी जातानाची मी वेगळीच होते कुणीतरी मलाच अनोळखी असलेली. दोघांचं असं वेगळंच जग मनाच्या वस्तीला आलेलं! ऐक ना, त्या लाघववेळांची हुरहूर आजही आहे सोबत! - तुझीच अभिसारिका

222 likes 66 shares
WhatsApp