Back to feed
V
Vanya Patel Family · Marathi · Family

*करियर निवडताना.... एक छान लेख वाचला. आजच्या जगात खरच असा विचार आवश्यक आहे!! आपल्यालाही आवडेल. आपल्या पाल्यासाठीही..... म्हणून पाठवतोय...* “असलं करिअर नको रे देवा..” माणसाच्या जगण्याच्या मुलभूत गरजा कोणत्या? असा प्रश्न विचारला की, आपण लगेच उत्तर देतो – “अन्न, वस्त्र आणि निवारा..” याच मुद्द्यावर म्हणजे “मुलभूत गरजा आणि त्यांच्याशी संबंधित करिअर्स” या विषयावर मी पालकांच्या चर्चासत्रात बोलत होतो. करिअर कसं निवडावं आणि प्रत्यक्षात ते कसं निवडलं जातं, हा त्या चर्चेतला एक प्रमुख मुद्दा होता. आपल्या मुलांची करिअर्स निश्चित करत असताना आपल्या विचारांची दिशा नक्की कशी असावी आणि महत्व नेमकं कोणकोणत्या गोष्टींना द्यावं, असाही एक मुद्दा चर्चेत आला. मुलं तर करिअर निवडताना गोंधळलेली असतातच, पण त्यांचे पालकच कितीतरी अधिक गोंधळलेले असतात आणि भ्रामक समजांची मोठमोठी वजनदार गाठोडी त्यांच्या डोक्यावर असतात, हे या निमित्तानं पुन्हा एकदा लख्ख दिसलं. “एक तीस वर्षांचा तरुण आहे. तो एका साध्या गावात राहतो. त्याच्याकडे एक साधी टू-व्हीलर आहे, पण बहुतेक वेळा तो पायी चालत जातो किंवा सायकल वापरतो. पहाटे साधारण पाचच्या सुमारास तो उठतो आणि फिरायला जातो. घरी येऊन सगळं आवरून, देवाची पूजा करून, न्याहारी करून तो सकाळी साडेनऊ कामावर जातो. दुपारी एक वाजता घरी जेवायला येतो. तीन वाजता परत जातो. संध्याकाळी साडेसहा वाजता घरी येतो. त्याची पत्नी देखील उच्चशिक्षित आहे. ती गावात अंगणवाडी चालवते आणि महिलांचा एक बचतगट चालवते. ती सकाळी साडेआठ वाजता घराबाहेर पडते, दुपारी साडेबारा वाजता घरी येते. बचतगटाचे काम ती दुपारी तीन ते संध्याकाळी ६ या वेळेत करते. सहा वाजता तिचं काम संपलेलं असतं. संध्याकाळचा वेळ बहुतेक करून तो मुलांसोबत घालवतो. त्यांचा अभ्यास घेतो. कधीकधी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातो. रात्री साधारण साडेआठच्या सुमारास घरात सगळेजण एकत्र जेवतात, आणि दहाच्या सुमारास घरातले दिवे मालवतात.” असं एक उदाहरण मी पालकांना दिलं. आणि प्रश्न विचारला की, ‘असं आयुष्य जगायला किती जणांना आवडेल?’ मला आश्चर्य वाटलं, पण बहुतेक सर्व जणांनी हात वर केले होते. महिला पालकांनीदेखील होकारार्थी हात वर केले होते. मी पुढे सांगत होतो, “या तरुणाचं दहा-बारा खोल्यांचं स्वतंत्र घर आहे. घराच्या चारही बाजूंनी चांगली बाग त्यानं केली आहे. हौस म्हणून एक कुत्रा पाळला आहे. बागेत झोपाळा आहे. दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी घरात आजूबाजूची मित्र-मंडळी जमतात, एकत्र जेवणाचा कार्यक्रम होतो. गप्पा-गोष्टी होतात. असं आयुष्य जगायला किती जणांना आवडेल?” पुन्हा जवळपास सर्वांनी हात वर केले. “तुम्हांला या लाइफस्टाइल मध्ये नेमकं काय आवडलं?” असं मी विचारलं. “कसलंही टेन्शन नसलेलं आयुष्य तो तरुण जगतोय. त्याला खूप मित्र आहेत. त्याला त्याच्या मुलांना वेळ देता येतो. संध्याकाळी वेळेवर घरी येतो. डोक्यावर कर्जाचे हप्ते नाहीयत. मोठे खर्च नाहीयत. खरं तर हेच आयुष्य चांगलं.” अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली. “आताच्या क्षणाला आपल्यापैकी कितीजण हे आयुष्य जगतायत?” असा प्रश्न मी विचारला, एकही हात वर झाला नाही. “तुम्ही सध्या जे करिअर करताय, त्यात तुमच्यापैकी कितीजण समाधानी आहेत?” असा प्रश्न विचारला, पण एकही हात वर झाला नाही. “समाधान, आयुष्य जगण्यातला आनंद, इतरांना वेळ देणं, स्वतःला वेळ देणं” या गोष्टी करिअर मध्ये महत्वाच्या असतात, हे कळूनही आता मागे फिरणं शक्य नाही, असल्या वाटा निवडण्यापूर्वीच विचार केला पाहिजे. पॉश आणि चकचकीत आयुष्याच्या मोहात पडून मोठमोठ्या कर्जांच्या हप्त्यांच्या ओझ्याखाली आयुष्यातली २५-३० वर्षं जगत राहणं, हे कितपत योग्य आहे? आणि याला यशस्वी करिअर म्हणायचं का? या कार्यक्रमाला एका मोठ्या कंपनीमधले एक उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांची पत्नी दोघेही आले होते. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. “मला रेडिओ ऐकायला आवडायचं. जुनी गाणी ऐकायचो. बागकामाचा नाद होता. सगळे सणवार आवडायचे. दिवाळीला किल्ला करायचो,पतंग उडवायचो. आता कित्येक वर्षांत मी यातलं काहीच केलं नाहीय. वेळच मिळत नाही. पूर्वी घरात नव्हता म्हणून शेजारी जाऊन रेडिओ ऐकायचो. खरं तर आता माझ्यासाठी रेडिओ खरेदी करणं ही किती किरकोळ गोष्ट आहे, पण ती आवड तेव्हा जी सुटली, ती सुटलीच. मी कारमध्ये सुद्धा गाणी ऐकत नाही. गेल्या ७-८ वर्षांत मी कुटुंबाला घेऊन कुठेही फिरायला गेलो नाही. मुलांच्या शाळेत गेलो नाही.त्यांच्या गॅदरिंगला मला कधी जाता आलं नाही. त्यांच्या वाढदिवसालाही मी अनेकदा नसतो. आमच्या लग्नाचा वाढदिवस, बायकोचा वाढदिवस हे तर कधीच बंद झालं. ऑफिसमधून घरी येण्याची वेळ ठरलेली नसते. रात्री उशिरासुद्धा कंपनीच्या कामासाठी फोन वाजतच असतात. पैसे मिळतात, पण आता तेच तेच काम करून फार दमून गेल्यासारखं वाटतं.” करिअर हे असं असतं का? स्वतःच्या आवडी-निवडी, छंद, मन रमवणं या गोष्टी सोडून देण्यासाठी असतात का? एखादा कोर्स करून किंवा अभ्यासक्रम पूर्ण करून, घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं, पैसे कमावण्यासाठी नोकरीच्या भोवती गोलगोल फिरत राहायचं आयुष्यभर.. याला करिअर म्हणतात का? पालकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार आज नाही करायचा, तर मग कधी करायचा? सततचा मानसिक-शारिरीक ताण, कामाचा न संपणारा व्याप, व्यस्त नीरस जीवनशैली, अनियमित वेळापत्रक, वेळी-अवेळी प्रवास, सतत ऑनलाईन असणं, सततची दगदग आणि त्यामुळं आपण आपल्या आनंदापासून कायमचं दूर जाणं.. हे सगळं सकारात्मक आणि यशस्वी करिअरच्या व्याख्येत बसतं का? करिअर काऊन्सेलर म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की, आनंदी आयुष्य जगण्यासाठी करिअर करायला हवं. पण, आपलं दुर्दैव हेच आहे की, आपण सामाजिक प्रतिष्ठेच्या मागे लागतो आणि स्वतःचं खरंखुरं जगणंच स्वतःच्या हातानं संपवून टाकतो. कष्ट जरूर करावेत, कारण यशासाठी ते आवश्यकच असतात. पण, परिश्रम घेणे आणि कामाच्या ओझ्याचे डोंगर उपसणे यात फार फरक असतो. तो फरक नीट समजून घेतला पाहिजे. आपल्या मुलांना त्यांचं आयुष्य नीट डिफाईन करायला शिकवणं फार फार गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी विद्यार्थी आणि पालकांना मदत करतो.. आयुष्य डिफाईन करायला आपल्या मुलांना मदत करा पालक मित्रांनो....! मानसतज्ञ –

28 likes 14 shares
WhatsApp