दृढ निश्चय करुन सकाळी उठलो, आवरलं, आणि पिशवी भरायला घेतली. बायको: कुठं निघालात? आम्ही: हिमालयात बायको: ट्रेकिंगला? आम्ही: सन्यास घेतोय. (बायकोने आमच्या कपाळाला वगैरे हात लाऊन पाहिले, बहुतेक ताप चेक करत असावी) बायको: आता हे काय मध्येच? आम्ही: सन्यासी लोकांना सध्या चांगला स्कोप आहे. 2024 ला या अखंड महाराष्ट्राचा मामु………… बायको: अहो, पण तो पर्यंत मार्केट राहील का सन्याशांच? आम्ही: जो पर्यंत सुर्य-चंद्र ………… बायको: (किंचाळत) आणि हे काय? या तांब्याच्या तांब्याचे हे हाल कोणी केले? (काल आम्ही गुपचुप तांब्याला दोन भोकं मारुन नायलॉनची दोरी बांधली होती.) आम्ही: ते कमंडलु आहे. बायको: (रागाने) आपल्या लग्नात मिळालेला तांब्या होता, माझ्या बाबांनी ……… आम्ही: हे बघ आता मोह, माया यापासुन दुर राहिले पाहिजे. आम्ही दोन वर्षाने परत येऊ, पण आपण 14 वर्ष तपश्चर्या केली असं लोकांना सांगायचं. बायको: (ओरडत) कायपण काय? अजुन लग्नाला दहा वर्ष झाली नाहीत. आम्ही: गणित चुकतय काय? बायको: साफ चुकतय. आम्ही: ठिक, मग सात वर्ष दिवस रात्र घोर तपश्चर्या केली असे सांगु. बायको: (त्राग्याने) काय करायचे ते करा, माझी मला कामे पडलीत. (आम्ही आमचे उरकुन निघायच्या तयारीत,बायकोची परत एंट्री) बायको: (किंचाळत) अहो काय घातलयं हे? आम्ही: (निर्विकारपणे) भगवी वस्त्र बायको: कसली डोंबलाची वस्त्र, माझा गाऊन आहे तो. आम्ही: पण भगवाच आहे ना? बायको: गप काढा. (मधेच पोराची एंट्री, कापडी पिशवी घेऊन) मुलगा: बाबा पैसे द्या. आम्ही: कशाला? मुलगा: रविवार आहे, मटण आणायचेय. बायको: (आमचे पाकिट काढुन घेत) हे पाकिट आणि एटीएम इथच ठेवा, याची गरज नसतेय सन्याशाला, (मुलाला उद्देशुन) हे घे पैसे. मुलगा: बाबा तुमचं फायनल झालयं का? आम्ही: काय बेटा? मुलगा: हिमालयात जायचे. आम्ही: कारे? मुलगा: नाही म्हणजे जाणार असाल तर मटण आमच्या दोघांच्या पुरतेच आणायला. (मनात चलबिचल) बायको: जा, दोघांसाठीच आण, यांच डोकं फिरलयं. (मुलगा चप्पल घालुन बाहेर पडणार, एवढ्यात) आम्ही: थांब, हे बघ मांडीचं जास्त दे म्हणावं, आणि थोडे चॉप्स, चरबी जास्त टाकु नको म्हणाव, मागच्या वेळी………… मुलगा: माहिति आहे सगळं (आम्हाला दुर्लक्षित करुन बाहेर) बायको: अहो इकडं या, जरा कांदा कापायला घ्या. (सदर क्षणिक मोहापायी अखंड महाराष्ट्र एका हुशार आणि प्रामाणिक मुख्यमंत्र्याला मुकला) नुकताच कांदा कापुन झाल्यावर अश्रुनयनांच्या साक्षिने पोस्ट टाईपली आहे.
A
Anaya Reddy
patriotic · marathi · patriotic
227 likes
23 shares