Back to feed
A
Aadhya Nair Love · Marathi · Heartbreak

माझी गझल.. रोज काही गूज गोष्टी सांगते माझी गजल आणि माझ्या अंतरीचे जाणते माझी गजल काय मी लपवू तिच्या पासून, मजला ना कळे! ना कधीही बोलले जे, ऐकते माझी गजल वागते मी नेहमी ,ती सांगते मजला जसे पण तरी माझ्यावरी रागावते माझी गजल ती अशी बेधुंद होते, झिंगते मदिरेपरी अन नशा चढता खरेही बोलते माझी गजल ती कधी होते सखी, आई कधी, तर शिक्षिका खेळते, जोजावते, सांभाळते माझी गजल .! लाजते, नटते कधी, तर भांडते रडते सुद्धा वार माझ्या लेखणीचे सोसते माझी गजल काढता मी खरवडूनी वाळल्या जखमा कधी आसवांसह भळभळूनी वाहते माझी गजल मी सुखी व्हावे म्हणे.. मज सांगते वेड्यापरी हातही देवापुढे मग जोडते माझी गजल

0 likes 0 shares
WhatsApp