**मोहाच्या मायाजालातून बाहेर पडून भक्ती रसाचा स्विकार केल्यास जीवन सुमधुर व आनंददायी बनते* *सिध्देश्वर स्वामीजी सोलापूर:- *"* मोहाच्या मायाजालातून बाहेर पडून भक्ती रसाचा स्विकार केल्यास जीवन सुमधुर व आनंददायी बनते *"* असे प्रतिपादन ज्ञानयोगी *सिध्देश्वर स्वामीजी* विजयपूर यांनी व्यक्त केले. सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटी आयोजीत व्याख्यान मास निमित्त ते बोलत होते. हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आज बुधवारी तेविसाव्या दिवसाचे पुष्प गुंफताना स्वामीजी बोलत होते. आपल्या प्रवचनात स्वामीजी पुढे म्हणाले... भारत देश हा पृथ्वी्वरील एक समृद्ध देश असून हा श्रेष्ठ ज्ञानी लोकांचा देश आहे. सत्य परंपरेचा व त्यागी लोकांचा देश आहे.अनेक थोर संत, ऋषीमुनी व थोर विचारवंत या देशात होवून गेले. भारत देश एक अदभुत देश आहे एक नाही, दोन नाही तर हजारो सुंदर, सात्त्विक, पवित्र व दिव्य महानुभवाचा देश म्हणजे भारत होय........ महावीर,बुध्द,पतंजली , बसवेश्वर,तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ,नामदेव,कान्होपात्रा... अशा किती तरी थोर व्यक्ती आपल्या देशात होवून गेल्या. प्रत्येकाने सुलभतेने जगण्याचा मार्ग सांगीतला. बसवेश्वर एका वचनात म्हणतात मानव आणि पशु यामध्ये खूप फरक आहे परंतु मानवाने आपल्या कृतीने हा फरक नष्ट केला आहे. सामान्य माणसा जवळ विषयासक्ती आहे. त्याला वस्तूचे आकर्षण आहे, संग्रह करण्याचा मोह आहे. विषयाचा विचार करुन केवळ त्याला पाहून जो संतोष मानतो,तोच खरा संत होय. वस्तू पाहीजेच म्हणल्यावर खरी तक्रार सुरू होते. मोहामुळे आम्ही पशु असल्या सारखे वागत आहोत.पशु जसे भुकेल्यावर कुठेही तोंड घालतो तसे मानवाचे झाले आहे. विषयाचे कुतुहल असणे हे नैसर्गिक आहे. परंतु सारं काही असूनही आपण असमाधानी आहोत. आपल्याला पकडण्यास ठेवलेल्या पिंज-यातील भजीची वासना ठेवल्यामुळे जसा उंदीर आत अडकतो. तशी पिंज-यात अडकलेल्या उंदीरा सारखी मनुष्याची अवस्था झाली आहे. या मोहरुपी पिंज-यात, आत अडकलेला मनुष्य अजून बाहेर आलाच नाही, अशी आपली अवस्था आहे. त्यामुळे रम्य निसर्गाच्या सान्निध्यात निर्मळ आनंद लुटत आनंददायी जीवन जगणे सोडून मानवाने मनातील विषयासक्ती, मोह-माया, लालसा याने स्वतःचे जगणे असह्य करुन ठेवले आहे.रावण एवढा मोठा राजा होता.लंकेसारखे मोठे राज्य होते ज्याला भूलोकीचा स्वर्ग म्हणले जायचे,पण सितेच्या मोह ठेवल्यामुळे रावणाचाही उंदिर झाला.त्यासाठी बसवेश्वर सांगतात मनातील मोह दूर कर विषयासक्ती दूर कर रे मानवा. आपल्या इश्वरास बसवेश्वर म्हणतात माझ्या मनात अनेक विषय आहेत, वस्तू संग्रह करायच्या मोहातून मला दूर कर रे कुडलसंगम देवा... भक्ती रस मला पाजव, प्रेमरस दे, तृप्ती दे आकंठ भक्ती रस दे.या आनंदासाठी ह्रदयी मधुर भाव हवा. हीच सरळ साधना होय. कशाचा ही मोह होवू नये असा भक्ती रस माझ्या मनात भर. मला शुद्ध कर मला सुबुध्दी दे. काय पहावे अन् काय पाहू नये,काय खावे काय खावू नये,काय धरावे अन् काय सोडावे,याची सुबुध्दी मला दे रे कुडलसंगमदेवा....... What should be desire what should not be desire. What should be eaten what should not be eaten. याचे सदैव भान ठेवले पाहिजे यातूनच समग्र मनुष्य जातीचे कल्याण होते. याचा साक्षात्कार शिक्षीत मनुष्यालाच होतो असे नाही त्यासाठी शिक्षणापेक्षा सुबुध्दी असणे महत्वाची. या सुबुध्दीने मला न्हाऊ घाल रे कुडलसंगमदेवा. एकदा सहाय्य कर रे भगवंता. असे जगावेगळं मागणं बसवण्णा आपल्या वचनात मागतात.जगण्याची दृष्टी व ऐहिक वैभव यात बदल करणारी ही प्रार्थना आहे. पुन्हा प्रपंच तर आहेच,या भूतलावर आम्ही जमलो हाच कुडल संगम होय. 🍃🌸🍃🌹🍃🌸🍃
191 likes
89 shares