Back to feed
V
Vanya Agarwal Family · Mixed · Family

वडील जाणून घ्यायचे आहेत ? चार मिनिटे वेळ काढून वाचाच !! ***************** आलिशान दिवाणखान्यात ऐंशी वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले, पलीकडे डायनिंगवर त्यांचा चाळीस वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाष्टा करतोय. तिथेच दहा वर्षाचा नातूदेखील वडिलांसोबत नाश्ता करतोय. इतक्यात खिडकीत एक कावळा येऊन बसतो. वृद्ध वडील आपल्या चाळीशीच्या मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?" मुलगा चकित होतो, की वडिलांना इतके पण माहीत नाही ? की माझी फिरकी घेताहेत ?? पण जाऊ द्या, असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो, "बाबा, तो कावळा आहे" *** दोन मिनिटे जातात. तो कावळा "काव काव" ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?" आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो, "अहो ssss तो कावळा आहे" *** पाच मिनिटे जातात. पुन्हा वडील मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?" आता हातातला पेपर बाजूला करून, मुलगा चिडून म्हणतो, "कितीदा सांगू ? की तो कावळा आहे म्हणून ? " *** यावर पुन्हा दोन चार मिनिटे गेल्यावर पुन्हा वडील मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?" यावर मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर ताड्कन फेकून वडिलांना जोरात म्हणतो, "चार वेळा तुम्ही विचारलंय आणि मी सांगितलंय की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही ? की जाऊ बाहेर ?" *** वृद्ध वडील हळूच उठून आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर ते नेहमी लिहीत असलेली रोजची डायरी असते. त्यातले एक पान काढून वाचत असतानाच त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो. आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो. त्या डायरीतील "ते" पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात.... *** "सकाळी पेपर वाचत असताना आज माझा 6 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू लागला. मुलाने मला चोवीस वेळा विचारले की ते काय आहे ? कोणता पक्षी आहे ? आणि मीही हातातला पेपर बाजूला करून चोवीस वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. यात आमचा अर्धा तास खूप छान गेला !!" ***** डायरीतील पुढची अक्षरे धूसर होत गेली. कारण चाळिशीतल्या त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ते थेंब डायरीच्या पानावर पडत होते !!

67 likes 26 shares
WhatsApp