Back to feed
A
Anaya Bose Family · Marathi · Family

शेंगा आणि वटाणे विकणारा तो मुलगा रात्री आठ - साडेआठची वेळ, महानगरपालिकेच्या हिरवळीवर आम्ही काहीजण गप्पा मारत बसलो होतो. एक छोटा मुलगा जेमतेम १०-१२ वर्षांचा, गळ्यात मस्त बॅग अडकविलेली, आमच्याकडे आला आणि शेंगा/वटाणे काही पाहिजे का ? अशी विचारणा करु लागला. खरंतर एका महत्वाच्या विषयावर आमची चर्चा सुरु होती, असं काही खाण्याचा कुणाचाच मूड नव्हता पण मुलाकडे नजर पडताच प्रत्येकाला वाटलं "घेऊ या". निदान त्याला जास्त फिरावं लागू नये म्हणून आम्ही सर्वांनीच एक-एक पॉकिट घेण्याचं ठरविलं (किंमत - फक्त ५ ₹ होती). तो मुलगा प्रत्येकाला काय आवडतं ? शेंगा की वटाणे ? असं विचारुन तेच पॉकिट देत होता. "काहीही दे चालेल" असं म्हटल तर, "तुम्हाला काय आवडतं ते सांगा" म्हणत होता. इतक्या कमी वयात त्याचं विक्री कौशल्य चकित करणारं होतं. ही मंडळी आपल्याकडून एखादं पॉकिट एक्स्ट्रा ढापणार नाहीत ना ? याचा तो हिशोब लावत होता, इतक्यात तिथं एक ज्येष्ठ व्यक्ती आली अन् त्याच्याकडून शेंगा घेताघेता आम्हाला म्हणाली, "एवढ्या कमी वयात काय वेळ आलीय बघा... याच्या आई-वडीलांची कीव येतेय" हे वाक्य ऐकल्या बरोबर तो मुलगा म्हणाला, " आई बाप नाही ओ, माझा बाप... माझ्या बापामुळं माझ्यावर ही वेळ आलीय. माझा बाप दारु पित हिंडतो म्हणून आम्हाला हे करावं लागतंय" यामध्ये आईचा काहीच दोष नाही हे सांगण्याची त्याची धडपड, भरुन आलेले त्याचे डोळे... क्षणातच स्वतःला सावरणारा तो मुलगा वयाने छोटा असला तरी मनाने, कर्तृत्वाने मोठा भासू लागला होता. अणप्पा काडादी शाळेत शिकणारा हा मुलगा "ढोर गल्लीत राहतो" असं सांगितल्यावर तर मला अधिकच जवळचा वाटू लागला कारण त्याच ढोर गल्लीत माझं बालपण गेलं, त्याच काडादी हायस्कूल मध्ये मी ही तीन वर्षे शिकलो. मन अस्वस्थ होऊ लागलं... काय करावं समजत नव्हतं... याला पुन्हा भेटून बोलावं असं वाटल्याने त्याला मुद्दामच विचारलं "इथं रोज येतोस का शेंगा विकायला ? " तर समजलं की त्याचा मोठा भाऊ जो सध्या दहावीत शिकतोय, तो रोज येत असतो पण सध्या तो आजारी असल्याने याला यावं लागलं. मुलगा छोटाच होता पण हुशार होता. भविष्यात त्याचं काय होणार ? आईची स्वप्ने साकार करण्यासाठी तो असाच जिद्दीने ऊभा राहून मोठा माणूस होणार की बापाच्या व्यसनाचा बळी म्हणून कुठंतरी मोलमजुरी करत राहणार ? मुलगा निघून गेला तरी त्याचा विचार डोक्यातून जात नाहीय. त्याच्या बापाची भेट घेऊन समजावून सांगितल्यास काही फायदा होईल का ? प्रत्येकामध्ये दडलेल्या कूविचारांच्या, अपप्रवृत्तीच्या कंसाचा संहार करण्यासाठी जगाचा पालनहार तो कृष्ण या अष्टमीला खरंच जन्मा येईल का ? डोक्यात नुसता विचारांचा गोंधळ माजलाय. असो. एक चहावाला या देशाचा पंतप्रधान झालाय ही गोष्ट आठवून आशावाद जिवंत ठेवतोय, तो शेंगा विकणारा मुलगाही पुढे उच्च पदावर पोहचावा या सदिच्छांसह तुर्तास थांबतो. (टीप :- त्या मुलाचं नाव आडनाव मुद्दामच शेअर केलं नाही, कृपया कुणी कमेंट मध्ये विचारु अथवा सांगू नये)

250 likes 13 shares
WhatsApp