सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥ माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥ पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी, म्हटलं साहेब बाप मरतोय, "कसं होणार"? म्हणून आत्महत्या करतोय ॥ साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग, विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥ मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला, त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥ मग भेटले उद्योगपती, बसायला गाडी आणि मोबाईल हाती म्हणालो साहेब! वाचवा बापाला, खुप खुप धन्यवाद मिळतिल बघा तुम्हाला ॥ साहेबः "सेझ ला जमीन देणार का विचार, करंजा तरी लाव म्हणावं मिळतील हजार" हजार लाख कोटी फक्त, दिसतच नाही फाशी आणि रक्त ॥ सावकाराला देण्यापेक्षा मला जमीन दिली असती, बापाला घर आणि तुला नोकरी मिळून गेली असती ॥ पुढे भेटला मित्र पत्रकार, वाटलं बघावा देतो का आधार, म्हणाला माझा बाप वाचव, अन्यायाविरुद्ध रान माजव ॥ मित्र म्हणाला, तुझा बाप खाईल काय रे तीन चार साप? तरच मी ते छापू शकतो, जाहिरातदारांना कापू शकतो ॥ मल हवे तीन पायाचे अस्वल किंवा एखादी नटी नखरेल, किंवा चालेल एखादा मुलगा आणि तो बुडेल अशी बोअरवेल ॥ गेला मरून बाप तर करूया बातमी सनसनखेज, तीन चार शो लाइव्ह करू आणि नंतर स्पेशल कव्हरेज ॥ शेवटी भेटले श्री हनुमान, कष्टी दुःखी हरपून भान म्हणाला देवा तुमचाच सहारा, तुम्हीच वाचवा माझा म्हातारा ॥ मारुती हसला म्हटला बेटा, मलाच माझी पडली चिंता रामाचेच अस्तित्व नाकारताहेत, तिथे हनुमानाची काय बात ॥ तुझ्या बापाची क्षमा मागतो, यमराजांशी चर्चा करतो, मरणार तर तो आहेच, स्वर्ग तेवढा मिळतो का ते पाहतो ॥ निघालो घराकडे होउन पुर्ण हताश, डोक्यात होते प्रश्नचिन्ह मन होते निराश घरी बाप फाशी घेउन गेला होता, बाळांना वाली कुणी सुद्धा उरला नव्हता ॥ लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं "मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं
201 likes
25 shares