Back to feed
V
Vihaan Bose Life · Marathi · Life

गावाकडच्या मातीतून...✍ आभाळमायेच्या पांघरुणाखाली जमिनीतून सोन पिकताना शेतकऱ्याच्या रक्ताचा एक एक थेंब सिंचित करतो मातीच्या कुशीला आणि मग अंकुरतात नवी स्वप्ने धुमारे फूटल्यासारखे. सृजनाची ही किमया शेतकऱ्याला जन्मजात दत्तक मिळालेली असते. परिस्थितीशी लढा देण्याचं बळ नाळ तुटल्यापासून त्याला मिळालेलं असत.त्यांच्यासारख्या मोठया दिलाची माणसं खेड्यागावात आज पण बघायला मिळतात.वरुन राकट दिसणारी ही शरीर जसजसं तुम्ही त्यांच्या मनाच्या विहरीत डोकावलं तस मायेचा ओलावा देत जातात. गावाकडच्या म्हाताऱ्या माणसांच्या गोष्टी ऐकताना काळीज सुपा एवढं होत,आज काल त्या ऐकायला मिळत नाहीत म्हणून मनाला चटका लागल्यासारखं होत.ऐन तारुण्यात त्यांनी गाजवलेल्या प्रताप ऐकले की पिक्चरच्या स्टोऱ्या पण फिक्या वाटतात.एखादया हिरोसारखं समरसून आयुष्य जगतात ते.फक्त 2 वेळची रोटी मिळावी हीच त्यांची भ्रांत.ते आपल्यासारखी चंगळवादी तर मुळीच नसतात फक्त एकच इच्छा असते आपल्या वाट्याला जे जगणं आलं ते पोरांला नको. पाऊस पाणी व्यवस्थित पडलं तर त्यांना नवा हुरूप येतो.पण विपरीत घडलं तर ही लोक चिंतेने खंगत जातात.अशातच एखाद्या वाईट व्यसनात बुडाले तर मात्र आयुष्याची राख रांगोळी होते.

148 likes 28 shares
WhatsApp