Back to feed
S
Saanvi Bagale Patriotic · Marathi · Patriotic

घेतलं शिंगावर दोनच दिवस आधी अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल नावाच्या मान्यवर वृत्तपत्रात एक प्रदिर्घ लेख प्रसिद्ध झाला होता. नरेंद्र मोदी हा धोका पत्करणारा नेता आहे, असेच त्याचे शिर्षक होते. त्या लेखातून उरीनंतर पाकिस्तानने संभाळून रहावे, कारण त्याने भारताला नव्हेतर मोदींणा डिवचले आहे, अशी भाषा वापरली होती. नरेंद्र मोदी हा नुसता बोलणारा वा चर्चेत गुरफ़टणारा नेता नसून, धोका पत्करण्याचे धाडस करणारा नेता असल्याचा इशारा पाकिस्तानला दिलेला होता. काही अमेरिकन वृत्तपत्रात असे लेख येतात, तेव्हा त्यातून तिथल्या सरकारच्या मनातले विचारही मांडले जात असतात. त्यातले संकेत जगातल्या राज्यकर्त्यांनी व मुत्सद्यांनी ओळखावे, ही अपेक्षा असते. याचा अर्थ असा, की मोदी पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. असा अमेरिकेने इशारा दिलेला होता. पण तो ओळखून आवरते घेण्याचा शहाणपणा पाकिस्तान करू शकला नाही. तो पाकचा गाफ़ीलपणा होता. त्यामुळे एका रात्रीत एकाच वेळी पाकव्याप्त काश्मिरच्या हद्दीत अडीच तीन किलोमिटर्स आत घुसून भारतीय सेनेने चार जागी थेट कारवाई केली. दोन तासात एकही सैनिकाचा बळी जाऊ न देता, आठ जिहादी छावण्या उध्वस्त केल्या आणि सुखरूप आपले जवान माघारी आले. पाकिस्तानचे दोन सैनिक व दोनशेहून अधिक जिहादी त्यात मारले गेल्याचे कळते. आठ नेमक्या जागी एकाच वेळी हल्ले ही बाब सोपी नाही, तर ओसामाला बिळातून काढून मारल्यासारखी कारवाई आहे. किंबहूना पाकिस्तान अशाच कारवाईला घाबरून उठसुट अण्वस्त्र वापरण्याच्या धमक्या देत होता. परंतु अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरत नाही, हेच ताज्या कारवाईने दाखवून दिले आहे. मात्र अशा कारवायांमध्ये गोपनीयता ही सर्वात मोठी भेदक गोष्ट असते. तीच गोपनीयता राखण्यासाठी आठदहा दिवस अगदी भारतीय माध्यमांना वा बहुतांश अभ्यासकांनाही उल्लू बनवणे भाग होते. सिंधूखोर्‍याचे पाणी रोखणे वा पाकला लाडका देश म्हणून असलेली मान्यता काढून घेण्य़ाचे गुर्‍हाळ चालू राहिले. भारत नेहमीप्रमाणे नेभळट आहे हेही दाखवण्याची गरज होती. ती त्यातून भागवली गेली. पण त्याच्याआड सज्जता चालली होती. याची किंचीत कल्पना असती तर पाकिस्तानने पोकळ धमक्या देण्याचे थांबवून प्रतिकाराची सज्जता केली असती. भारताच्या कमांडोंना इतक्या सहज ही कारवाई साध्य झाली नसती. हा हल्ला वा त्यातली भेदकता दुय्यम आहे. त्याने साधलेले परिणाम मोठे आहेत. पाकच्या अण्वस्त्र धमकीतली हवा निघून गेली. भारत चोख उत्तर देऊ शकतो, हे सिद्ध झाले आणि भारतीय सेनादलाचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. कुटनिती व रणनिती यांचा अपुर्व संगम म्हणून मोदींची पाठ थोपटावीच लागेल. कारण त्यांनी अंगावर येणार्‍यांना शिंगावर घेण्याची धमक दाखवली आहे.

102 likes 77 shares
WhatsApp