*निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करत नाही ?* ...... प्रा.य.ना.वालावलकर [ynwala@gmail.com, 9404609126] जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वसाक्षी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, करुणासागर, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा उपासनेच्या ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्यांनाच आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. "असा कोणी ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात तरी पूर्वीपासून, अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून,आडून-दडून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्या सर्व शक्तिमान देवाला कोणती अडचण आहे ? कसली भीती वाटते ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्या घटना तो सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान, करुणेचा सागर असलेला देव निष्क्रियपणे पाहात राहातो. हा सार्वत्रिक अनुभव आहे. आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्व जन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व खरे मानून मनाचे समाधान करतात.आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरेनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल... शिक्षा करील, अशी भीतीही त्यांना वाटत असावी. *या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून.* हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहे ना? ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे कधी नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा मानत नाहीत. आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा-प्रार्थना करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का ? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का ? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्या तसेच दर्शन घेऊन परत येणार्या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? होतात... होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडी करण्यासाठी निघालेले दरोडेखोर ? याचा अपघाताशी काही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात. विचार केला तर आपल्याला समजतात. नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतात. हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष परमेश्वराचे अस्तित्व नाकारणार्या नास्तिकांना तो परमेश्वर शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे उत्तर असे आहे की ,ईश्वर अस्तित्वातच नाही. तर शिक्षा काय करणार ? वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. गरिबांच्या समस्या, विवंचना अधिक तीव्र असतात. श्रीमंत पालक आपल्या मुलांना इंजीनियर, डॉक्टर, सी.ए. करू शकतात. उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवू शकतात. त्यांचे भविष्य घडवू शकतात. गरिबांच्या आयुष्यात अनिश्चितता अधिक असते. असुरक्षितता असते. त्यामुळे तिथे आस्तिकतेचे, अंधश्रद्धांचे प्रमाणही अधिक असते, हे खरे आहे. ते काही असले तरी आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. *जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही.* यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? *अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. महाराष्ट्रातील काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली.मानसन्मान मिळाले.सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही.* आस्तिकांची दोन उदाहरणे द्यायची तर... 1) तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला.तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्नी भूकबळी ठरली. तुकारामांनी अभंगात लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. 2) तसेच रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परमभक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते "असे ते सांगत असत. परमहंसांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी त्यांना विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." नंतर परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली,"इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज." खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर कोण काय करणार ? *देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे.* मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल.थोडक्यात म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांचा अंगीकार करावा. ऊर्जा, वेळ आणि पैसा व्यर्थ खर्च करू नये.
259 likes
14 shares