Back to feed
A
Arjun Iyer Life · Marathi · Life

प्रयोगशील राष्ट्रपिता महात्मा गांधी आज २ ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दिवस. "माझे जीवन, हाच माझा संदेश" - हे वाक्य आजपर्यंत फक्त महात्मा गांधीच म्हणू शकले, इतके त्यांचे जीवन पारदर्शी, प्रयोगशील आणि सत्यनिष्ठेवर आधारीत होते. माझ्या घरातल्या छोट्याश्या ग्रंथालयामध्ये "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक आहे. माझ्या वडिलांनी मला ते वाचावयास दिले. आपल्या मुलांना आपण पुस्तके वाचावयास द्यायला हवे, ते देण्याअगोदर आपण स्वतः ते वाचावयास हवे. ही शिकवण मला माझ्या वडिलांकडून लहानपणीच मिळाली. महात्मा गांधीजींचे "माझे सत्याचे प्रयोग" या पुस्तकाचे मी पारायणे केली. प्रत्येक वेळेस एक नवीन विधायक अर्थ या पुस्तकातून मला मिळत गेला. आजही ते पुस्तक आमच्या संग्रही आहे. महात्माजींचे संपूर्ण आयुष्य हे सत्य, अहिंसा, अखंड विधायक कर्माची महती सांगणारे आहे. महात्मा गांधी हे प्रयोगशील होते. स्वतःचे जीवनच त्यांनी त्यांची "प्रयोगशाळा" बनवली होती. या पुस्तकामध्ये महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य "जसे आहे तसे" मांडले आहे. महात्मा गांधी यांना अहिंसेचा धडा कसा मिळाला, सत्यामध्ये असलेली "ताकद" कशी त्यांच्या लक्षात आली, त्यांच्यात संवेदनशीलता कशी निर्माण झाली…. या आणि अशा कितीतरी प्रश्नांचा उलगडा या पुस्तकाच्या माध्यमातून होऊन जातो. यासाठी या पुस्तकाची पारायणेच करावी लागतात, हृदयातूनच ते वाचावे लागते. भाषेचा चटपटीतपणा, एखादा प्रसंग खुलवून सांगण्याची किमया, अनाठायी आत्मसमर्थन असा कुठलाही प्रकार या पुस्तकात नाही, तर एका महान अशा मानवी-प्रयोगशाळेचे धावते आणि पारदर्शी वर्णनच आहे. साध्या राहणीतले आणि उच्च विचारसरणीचे मोठेपण येथे दिसून येते. "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक वाचा, आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना, मित्रांना वाचावयास सांगा. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन.

166 likes 61 shares
WhatsApp