Back to feed
S
Shaurya Agarwal Patriotic · Marathi · Patriotic

बुवाबाजी - भाग ११ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून) ======================================== बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद - (६) हे सर्व बाबा बुवा स्वतः मध्ये विलक्षण गुंतलेले असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तीमहात्म्य वाढवणारी असते. बाबांच्या भक्तांचे विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट रंगाच्या माळा, छातीवर महाराजांचा फोटो असलेला बिल्ला तसेच पेन, महाराजांनी दिलेला जीवन उद्धरून नेणारा एखादा छोटा-मोठा मंत्र यामधून प्रथम एकजुटीची भावना निर्माण होते. या भावनेत एक समाधान व सामर्थ्य असते. पुढे पुढे या सर्व वातावरणाची सवय होते; त्याच्याशिवाय राहणे अशक्य होते. तशी इच्छा एखाद्या भक्ताला झालीच तर त्यावर चाकोरीबाहेर न राहण्याची सक्ती केली जाते. या सर्वामध्ये एक प्रकारची गुप्तता असते. महाराजांची भक्ती सोडून सर्व जीवन व्यर्थ आहे. असे वाटणे ही जीवनाची इतिकर्तव्यता बनते. महाराजांना विरोध करणे महापाप ठरते.त्यांना विरोध करणाऱ्या दुर्जनांचा नाश पुण्यदाइ मानला जातो. महाराजांच्या अनुग्रहानेच जीवनाचे कोट कल्याण होईल, असा संदेश बिंबवला जातो. यामुळे भक्त हा कडवा सैनिक बनतो. बुवाबाजी ही एक अभेद्य व्यूहरचना बनते. ती टिकवून ठेवण्यासाठी सतत ब्रेन वॉशिंग चालू राहते. या सर्वातून माणसाचे वैशिष्ट्य असलेली चिकित्सक बुद्धी तहकूब केली जाते. (७) वरील सर्व बाबींचा एकत्रित परिणाम असा होतो की, मानसिक गुलामगिरी निर्माण होते. हातापायातील बेड्या या स्वातंत्र्याचे अडथळे वाटण्याऐवजी फुलांचे गजरे वाटू लागतात. राजकीय, आर्थिक पारतंत्र्यापेक्षा हे मानसिक पारतंत्र्य अधिक घातक असते. बुवा, महाराज, स्वामी असे लोक माणसाच्या बुद्धीची हत्या करण्याचे जणू कारखानेच चालवतात. (क्रमशः)

60 likes 51 shares
WhatsApp