बुवाबाजी - भाग ३ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून) ======================================= माणसे बुवा बाबांकडे का जातात - (६) वैफल्यग्रस्त स्त्रिया - आपल्या समाजात अनेक कारणाने बाईचे मन वैफल्याने मोडून पडते. त्या मनाला आधार देणे व उभे करणे यासाठी आज कोणतीही अधिकृत यंत्रणा नाही. देव, धर्म, पूजापाठ या माध्यमातून काम करणाऱ्या बाबाचा आधार अशा स्त्रियांना घेता येतो कारण त्याला सामाजिक अनुमती असते. (७) प्रारब्ध, नियती, दैव - या कल्पना प्रत्येक भारतीयाच्या मनात आपोआपच घट्ट बसलेल्या असतात. हे नशीब बदलण्याचे सामर्थ्यही कथित दैवी शक्ती ज्याकडे आहे, त्या बाबा, बुवा यांच्यात असेल असा सामान्य माणसाचा पूर्ण विश्वास असतो. (८) आत्मा, परमात्मा, ब्रह्म, मोक्ष, मुक्ती - या शब्दांचा प्रभावही बहुसंख्य भारतीयांवर असतो. या सर्वांचा विपुल वापर करणारा बाबा स्वाभाविकपणेच लोकांना जवळचा वाटतो. (९) चमत्कार - बाबांचे चमत्कार हे चिल्लर हातचलाखीचे प्रकार असतात. मात्र ते लोकांना दैवी शक्तीचे अविष्कार वाटतात, त्यामुळे बाबावरील विश्वास वाढतो. (१०) गुरुपरंपरेला मान्यता - आपल्या समाजात, म्हणजेच समाजातील पारंपारिक धार्मिक विचारात बाबा गुरु महाराज याबद्दल एक अपार श्रद्धा असते. व्यक्ती गुरुस्थानी मानली की, तिच्या बाबतीत बुद्धीने शरणागती पत्करणे व त्या व्यक्तीचे उदात्तीकरण करणे हे गुरु शिष्य नाते आपल्या समाजात, लोकमाणसात अस्तित्वातच आहे, याचाही फायदा बाबाला मिळतो. (क्रमशः)
89 likes
22 shares