मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं ! सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं ! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत ? डोळे उघडून पहा तरी : प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत ! हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं ! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं ! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं ! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! आपण असतो आपली धून, गात रहा; आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा ! झुळझुळणार्या झर्याला मनापासून ताल द्या; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या ! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं ! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
213 likes
61 shares