मराठा मोर्चांवर राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांची भूमिका शक्ती ही संयमामुळे अधिकच शोभते. संयम ही शक्तीला महाशक्ती बनवतं असते. सध्या महाराष्ट्रात निघत असलेले बहुजनांमधील थोरल्या भाऊ असलेल्या मराठा समाजाचे मोर्चे हे अशीच महाशक्ती अभिव्यक्त करीत आहेत. वर्षानुवर्षे स्वत:हून काहीच न बोललेला हा समाज आज बोलू लागलाय तोही मूकमोर्चांच्यामाध्यमातून. तरीही समाजातील काही मतलबी घटक हे या महाशक्तीला हिनवण्याचं काम दुष्टबुद्धीने करू लागलेत. तर दुसरीकडे काही राजकारणी समाजशक्तीचं श्रेय हडपण्याचं राजकारण करण्यासाठी घृणास्पद प्रयत्न करत आहेत. खरंतर शांततेच्या मार्गानं व्यक्त होणाऱ्या या शक्तीची दखल समाजातील मान्यवरांनी घेऊन समाजाच्या मनात साचलेला असंतोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. एका बहुजन समाजाचा तेजोभंग कुणी करू नये. तसं झालं तर ते देशासाठीही घाताचं ठरेल. सध्या ज्या कोपर्डी प्रकरणामुळे हा असंतोष उफाळलाय. त्या प्रकरणातील पीडित कुटुंब आज माझ्याकडे इंदुरला आलं. याआधीही त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी येथे आणलं होतं. आता भेटायला आले तेव्हा त्यांनी जे सांगीतलं ते धक्कादायक आहे. एकीकडे शक्ती एकवटत असतानाच दुसरीकडे ते कुटुंब आजही धमक्यांच्या सावटाखाली आहे. त्यामुळे वेगळीच भीती वाटते. एकीकडे मोर्चांचा वापर करून श्रेय हडपून राजकारण करण्यांचा काही स्वार्थी राजकारण्यांचा प्रयत्न तर दुसरीकडे पीडित कुटुंब मात्र भीतीच्या सावटाखालीच. त्यांना न्याय मिळवून देण्याकडे दुर्लक्ष झालं तर काळ माफ करणार नाही. जेव्हा जेव्हा समाजात अनिष्ठ घडलं तेव्हा, तेव्हा हा बहुजनसमाजच पुढे सरसावला. बहुजनांपैकीच माझ्यासारखे असंख्य सातत्यानं शेतकरी आत्महत्या, नराधमांचे अत्याचार याविरोधात लढत राहिले आहेत. त्यामुळे आधी मराठे कुठे होते हे विचारणंच चुकीचं ठरेल. हाच प्रश्न कोपर्डीच्यावेळी इतर काही समाजांच्या नेत्यांबद्दल बहुजन मराठा समाजाच्या मनात आला. तर चुकीचं कसं म्हणार? पण जाऊ द्या. ते आता नको. राखीव जागांचा लढा प्रत्येक समाजाच्या अजेंड्यावर आहे. मिळत नसल्यांनं असंतोषही आहेच. मग त्याची दखल घ्यायची की हक्कासाठी विधायक मार्गानं लढणाऱ्यांना एका बहुजन समाजाला हिणवायचं? तसंच जर अॅट्रोसिटीसारख्या एखाद्या कायद्याचा गैरवापर सुरू असेल तर त्यात आवश्यक सुधारणा घडवण्यात गैर काय? महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. आम्ही गेली अनेक वर्षे संविधानातील हक्कांची माहिती सामान्यांपर्यंत पोहचवून त्यांना शक्ती देण्यासाठी संविधान जागरणासारखे उपक्रम राबवतो. बाबासाहेबांनी संविधानात जो कायदा दिला नव्हता त्या कायद्यातील काही चुकीचं काढण्याची मागणी केली तर त्यात गैर काय? कायदाच रद्द करा असं नाही तर उलट तो अधिक शुद्ध, प्रभावी होण्यासाठी त्यातील दोष काढा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना साजेसं असंच बहुजन मराठा समाज वागतोय. आता काही नेते मराठा आणि दलित एकता परिषदेचं नवं राजकारण करू पाहत आहेत. काय गरज आहे? फूट कुठे आहे? कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, ही विनंती. आजवर बहुजन समाजाने काय केलेंय? आमची संस्था सांगोल्यात अनुसुचित जातींच्या मुलांसाठी केंद्रीय निवासी शाळा चालवते. उस्मानाबादेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, आपत्तीग्रस्तांची मुले, देवदासींची मुले यांच्यासाठी शाळा सुरू केलीय. बुलडाण्याला खामगावमध्ये संस्था पारधी समाजाच्या मुलांसाठी आश्रमशाळा चालवते. तुरूंगातील कैंद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करतो. जात-पात न पाहता. आपलं मानूनच ना. ते का? कारण आम्ही कुणालाही परकं नाही आपलंच मानतो. आजवर मराठा समाजानं बहुजनांच्या थोरलेपणातून प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. अगदी त्याचं नुकसान होत असतानाही. आजही बहुजनसमाजातील सर्वच सामान्यांमध्ये आणि मराठी समाजातील सामान्यांमध्ये आपुलकीचं नातं आहे. खरंतर असा भेदच नाही. मात्र काही ही आपुलकी संपवून भांडणं लावू पाहत आहेत. मराठा समाजाविरोधात भडकावू पाहत आहेत. हे वाईट आहे. एक समाज जागा होत असताना दुसऱ्या समाजाला भडकवून उभे करणे घातक आहे. आजवर जेथे बोलावले तेथे गेलो. प्रत्येकाच्या सुख-दु:खात आपुलकीनं सहभागी झालो. त्या हक्कातूनच एक आवाहन कृपया मोर्चाला प्रतिमोर्चे काढू नका. चिथावणीला बळी पडू नका. आज ते त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. तुम्ही साथ द्या. उद्या तुमच्या लढ्यात ते साथ देतील. एकीकडे हे राजकारण तर दुसरीकडे श्रेयासाठीच राजकारण. समाज कुणाची वाट न पाहता स्वत: जागा होऊन काही करत असताना त्यांना प्रोत्साहन द्यायचं सोडून आता राजकारण सुरू केलं गेलं आहे. आजवर या मोर्चांविषयी मी जाहीर काही बोललो नव्हतो, आता बोलतोय ते या घृणास्पद राजकारणामुळे. उगाच कुणीतरी पुढे सरसावून मोर्चांमध्ये साकारणाऱ्या महाशक्तीचं श्रेय लाटण्याच प्रयत्न करू नये. ही शक्ती पवित्र आहे. स्वयंस्फुर्त आहे. तिचा वापर करून घेण्याचा प्रयत्न करू नका. जे तसा प्रयत्न करतील त्यांना तसे प्रयत्न बाधतील. ही शक्ती सत्याची आहे. सत्यापेक्षा सत्ताही मोठी नसते. सत्तेला या सत्याची प्रचिती येत आहेच. अखेर अंतिम विजय हा सत्याचा, बहुजन मराठ्यांच्या महाशक्तीचाच होईल, यात शंका नाही. सध्या जे मोर्चे काढले जात आहेत त्यांच्या आयोजकांना माझं एक नम्र आवाहन आहे. तुम्ही समाजाला सोबत घेऊन सामाजिक क्रांती घडवत आहात. काहींचा चिथावण्याचा प्रयत्नही सुरू आहे. तुम्ही शांतच राहा. शक्ती ज्यांच्याकडे असते ते कमालीचा संयम बाळगतात. जमणारी गर्दी स्वच्छता, शिस्त हे सारं कौतुकास्पद. हे बिघडू देऊ नका. काही राजकारण्यांना आता आंदोलनच हायजॅक करायचे वेध लागले. त्यासाठी अगदी टोकाची भाषा केली जाईल. पण फसू नका. त्यांना तसं करता येईल असं वागू नका. मग ते आपले म्हणवणारे असले तरीही. कमालीचं सावधच राहावं लागेल. आपल्या एकजुटीचा कोणालाही राजकीय लाभ घेऊ देऊ नका. आजवर समाज असाच वापरून घेतला गेला. तरूणांवर हजारो गुन्हे नोंदवले गेलेत. ते तसेच आहेत. नेते मजा करत राहिले. बसं झालं हे सारं. ज्यांना जे काही राजकारण खेळायचे आहे त्यांनी ते खेळावे. मात्र या शक्तीच्या वाट्याला जाऊ नये. आजवर मी सामाजिक कामांमधून समाजासोबतच राहिलो. यापुढेही राहीनच. शेवटी एकच. उगाचच डिवचू नका. त्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. सरकारला माझं आवाहन आहे. उगाच बुजगावण्यांना महत्व देऊ नका. तुमचीही फसवणूक होईल. मोर्चातील शक्ती ही एक वेगळी समाजशक्ती आहे. तिच्याशी थेट संवाद साधा. त्यांच्याशी बोलून त्यांच्या भावना समजून घ्या. भावना समजून घेतल्या की समस्यांवर उपाय शोधणं सोपे जाईल. तसं नाही केले तर हा असंतोषाचा लाव्हा अधिकच उफाळत राहील. या समाजशक्तीला विधायक कार्यातून राष्ट्रउभारणीसाठी उपयोगात आणणे ही आजची गरज आहे.
17 likes
90 shares