मला आवडलेली कवी " कुसुमाग्रज " म्हणजेच कवी वि. वा. शिरवाडकर यांची अतिशय सुंदर कविता ..प्रा दिपाली कवितेचे नाव : * तपश्चर्या * ( * समिधा * कविता संग्रह ) पारिजातकाच्या झाडास त्या वेळी अशी सुंदर सुगंधी फुले येत नव्हती . कसला तरी गंधहीन आणि सौंदर्यहीन मोहोर येई आणि मातीला मिळून जाई . इतर वृक्षांचे आणि फुलझाडांचे वैभव पाहून पारिजातकाच्या अंत:रंगात असूया उत्पन्न झाली . तो दु:खी होऊ लागला . सभोवारची सुंदर झाडे त्याच्या दु:खाची कुचेष्टा करू लागली . त्याच्या विषादाचे विडंबन करू लागली . पारिजातकाने ठरवले , जगातील कोणत्याही वृक्षाजवळ नसलेले वैभव आपण मिळवले पाहिजे , वाटेल ते करून सर्व वनस्पति-सृष्टीत श्रेष्ठत्व संपादन केले पाहिजे . त्याने तपश्चर्या सुरू केली . त्याच्या नम्र मस्तकावरून कालप्रवाहाच्या असंख्य लाटा गेल्या . अगणित वादळे गेली . अनेक वणवे गेले . पण त्याचा निर्धार ढळला नाही . तो खाली मान घालून तपश्चर्या करत राहिला . अखेरी त्याचे तप सफल झाले , परमेश्वर त्याच्यापुढे येऊन उभा राहिला . " वर माग " म्हणून पारिजातकास देवाने आज्ञा केली . तपाला बसते वेळी मनात असलेली इच्छा पारिजातकाने दिर्घ श्रमाच्या ग्लानीमध्ये देवाला बोलून दाखवली . तो म्हणाला - " चांदण्यासारखी सुंदर , निशिगंधासारखी शुभ्र , कमलासारखी आरक्त , ज्यांचा गंध मधूर आहे , पण उद्दाम नाही अशा फुलांचा विपूल फुलोरा मला लाभावा " . ईश्वराने त्याची इच्छा सफल केली . स्वर्गात शोभण्यासारख्या सुंदर फुलांनी पारिजातक बहरून गेला . जणू असंख्य स्वप्नांचा थवाच त्याच्या फांद्यांवर येऊन बसला होता ! परिमलाच्या द्वारा त्याच्या वैभवाचे वृत्त सा-या रानात पसरले . सर्व वृक्ष त्याच्यापुढे नम्र झाले . त्यांनी पारिजातकाचा जयजयकार केला . पारिजातकाने डोळे उघडले . आपले अतूल वैभव त्याच्या दृष्टीस पडले . त्याची ग्लानी उतरली . तो आवेशाने म्हणाला , " मी तामसी आहे , मला हे वैभव काय करायचे ? " आणि आपल्या देहावर बहरलेली सारी संपदा त्याने खालच्या धूळीत टाकून दिली ! तेव्हापासून पारिजातकाच्या फुलांचा सडा नेहमीच जमिनीवर पसरलेला आढळतो .
121 likes
76 shares