Back to feed
M
Meera Mehta Life · Marathi · Life

राधा, रुक्मिणी आणि सत्यभामा यांचे कृष्णाशी नाते नेमके काय आहे ? पारिजातक आणि कालिंदी यांचे अर्थ काय ? या नात्यांचा ग्रेससारख्या प्रतिभावंत कवीने लावलेला अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मग आवर्जून वाचा .... रुक्मिणी आणि सत्यभामा ह्या दोघींचेही श्रीकृष्ण हे पती. श्रीकृष्णाच्या पत्नीचा दर्जा या दोघीना मिळाला मात्र कृष्ण त्यांना मिळाला का ? अर्थातच याचे उत्तर नाही असे आहे. या दोघींनी कृष्णावरील प्रेमापेक्षा त्या प्रेमाचे प्रतिक महत्वाचे मानले. साध्य काय आहे हे त्यांच्या लेखी महत्वाचे नसून त्यांनी साधनाला जास्त महत्व दिले त्यामुळे त्यांना कृष्ण कधीच साध्य झाला नाही. या प्रेमाचे प्रतिक म्हणून ग्रेसांनी प्राजक्ताचा अप्रतिम वापर केला आहे. प्राजक्ताचे आणखी दोन वेगवेगळे संदर्भ इथे येतात ते पौराणिक अनुषंगाने अन शब्दसौंदर्यासाठी वापरल्या जात असलेल्या उपमा अलंकाराच्या दृष्टीने. पुराण काळात हा वृक्ष देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी एक मानला जातो. स्वर्गात इंद्राच्या दरबारी हा वृक्ष होता असेही मानले जाते. स्वर्गसुख आणि स्वर्गीय आनंद ह्या सर्वांना हव्याहव्याशा कल्पना, त्यात रममाण व्हायला सर्वांना आवडतं. त्यातलं आत्मसमाधान वेगळं आहे, ते भौतिक सुखाच्या अंगाने जातं. कृष्णाने विषयसुख वा भौतिकसुख या दृष्टीने स्वर्गीय प्रतीकाचे परिमाण असणारं हे प्राजक्ताचे झाड वसुंधरेवर आणले. ग्रेस अत्यंत चातुर्याने लिहितात की "हा वृक्ष बळजोरीने आपल्या अंगणात लावून घेतला." कृष्णविचार अंगी न भिनवता त्याच्यावरील प्रेमाचे प्रतिक आपल्याकडे असावे हा अट्टाहास यामागे असणार हे उघड आहे. या पुढच्या पंक्तीत ग्रेस लिहितात, "जीवाला आलेलं पांगळेपण" !.. याचा अर्थ काय ? मनुष्य विविध इच्छावासनांच्या आहारी जातो आणि आपलं खरं सुख गमावून बसतो. जगण्यातला खरा अर्थ, जगण्याचे ध्येय गमावून बसतो अन त्यातून मन कोसळत जाते. हवे असण्याचा मानवी हव्यास अनंत अन अक्षय हे याचं कारण आहे. यातून येणारं नैराश्य, असफलता यातून माणूस पुन्हा देवाकडे आश्रय मागतो. इथे देखील तो मनोभावे देवाचा अन देवत्वाचा खरा अर्थ ध्यानी न घेता त्याचे प्रतिक असणाऱ्या एखाद्या अधिभौतिक वस्तूच्या मागे लागतो. ग्रेस "हव्यासपूर्तीच्या कुबडया" असं याचं वर्णन करतात. ईश्वरीय आराधनेच्या खऱ्या कल्पना अन ईश्वराचे खरे अस्तित्व न समजून घेता हाती असणाऱ्या त्याच्या भक्तीप्रेमाच्या प्रतिकालाच आपण ईश्वर समजून जातो अन खरा ईश्वर कधीच भेटत नाही. आपली भक्ती अशी वरवरची असून देखील ईश्वरी प्रेमाचे प्रतिक म्हणून जी वस्तू आपण आपल्याकडे ठेवून घेतो, बाळगतो, संवर्धन करतो ती मात्र आपल्या अंतरीचे भेदाभेद ध्यानी न घेता आपल्यापाशी वर्धिष्णू होत जाते. सत्यभामेने देखील खरा कृष्णार्थ जाणून न घेता प्रेमदर्शविण्यासाठी प्राजक्त आपल्या दारी लावून घेतला. यामुळे कृष्ण काही तिला मिळाला नाही मात्र त्यातून घडले भलतेच ! सत्यभामेची कृष्णभक्ती खरी की खोटी या फंदयात न पडता तो प्राजक्त बापुडा तिच्या अंगणात फुलत गेला, तो इतका फुलला की त्याची बहारदार फुले सत्यभामेच्या शेजारी राहणाऱ्या रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली. आपण केलेल्या कामाचा लाभ आपल्याला न होता दुसऱ्यास झाला तर आपल्याला वैषम्य वाटते. त्याचवेळी जर आपल्या कामाचा खरा फायदा जर आपण ज्यांचा मत्सर करतो त्यांना झाला तर मग मात्र आपल्या जीवाला हुरहूर लागते. मानवी मनाचा हा दोष ग्रेसांनी मस्त टिपलाय. प्राजक्ताची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडू लागल्याने तिचा चडफडाट झाला अन या फुलांच्या आशेने वेडावलेल्या रुक्मिणीला वाटू लागले की ह्या वृक्षाचे मूळ आपल्या अंगणात असावे, (तिलाही कृष्ण आपल्याकडे असावा असं वाटण्याऐवजी त्याचं प्रतिक असणारा वृक्ष आपल्याकडे असावा असंच वाटलं) मात्र तिला काही या झाडाचे मूळ मिळू शकले नाही. सत्यभामेला कृष्ण तर नाहीच मिळाला, उलट हट्टाने तिने त्याच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून जे रोप अंगणात लावले त्याची फुले तिची सवत असणाऱ्या रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली तर रुक्मिणीला आयत्या मिळणाऱ्या फुलांवर समाधान न होता आपल्याकडे समूळ प्राजक्त असावा असे वाटू लागले, तिलाही तो सकळ प्राजक्त काही मिळाला नाही. ग्रेस लिहितात - "स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वत: मोकळा झाला." ईश्वर ज्याला जे पाहिजे तो देतोच मात्र पूर्ण कोणालाच देत नाही, मात्र याला एखाददुसरे राधेसारखे अपवाद असतात ! कोणाला काय पाहिजे असते अन कोणाच्या मनात इतरांबद्दल काय भावना आहेत याचं ज्ञान निर्मिकाला नक्कीच असतं, तो त्या प्रमाणे त्या त्या व्यक्तीला देत जातो. मात्र तो कोणालाही रिक्तहस्त ठेवत नाही. सत्यभामा आणि रुक्मिणी या दोघीजणी सवतीभाव मनी ठेवून वागायच्या, त्यांना कृष्ण कळलाच नाही. त्यांच्यात मत्सर वाढतच राहिला, सत्यभामेने जेंव्हा कृष्णप्रेमाचे प्रतिक मनी वांछिले तेंव्हा म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने मत्सराचे प्रतिक म्हणून हा पारिजातक त्यांच्या अंगणी असा काही खोचून दिला की दोघींना एकाच वेळी हव्यासपूर्तीचा आनंद आणि एकमेकींचा द्वेषपूरक हेवा वाटत राहावा ! त्यांनी जे मागितलं ते त्यांना कृष्णाने दिले मात्र राधेला असा वृक्ष त्यांनी दिला नाही. कृष्णाने असे का केलं याचं अतिशय भावविभोर करणारं देखणं अन अर्थपूर्ण उत्तर ग्रेस देतात - "राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे शृंगारणार ?" जो स्वतः कृष्णमय होऊन जातो त्याला कृष्णप्रेमाच्या प्रतिकाची गरजच ती काय ? असं सूचक भाष्य या पंक्तीत आहे. राधेसाठी त्यांनी योजलेला कृष्णकळी हा शब्दच बोलका आहे. जरी हा प्राजक्त कृष्णाने राधेला दिला तरी तो तिच्या बागेत कधी रुजणार नाही कारण तिची बाग आत्मदंग आहे, तिचा आत्माच जिथं कृष्ण आहे तिथं त्याच्या वेगळ्या प्रतिकांच्या असण्याला अर्थ उरत नाही. मग कोणालाही रिक्तहस्त न ठेवणारया या जगतदात्याने राधेला काहीच दिले नाही का ? कृष्णाने राधेलाही तिचं दान दिलंय. त्याने स्वतःलाच तिच्या आत्म्याच्या रोपवाटिकेत रुजवलेय. जेंव्हा हे चराचर नव्हते, फक्त अष्टदिशा नव्हत्या तेंव्हाही ह्या निरलस अल्लड मुलीच्या रूपाने निस्सीम कृष्णभक्ती अस्तित्वात होती असं ग्रेस सूचित करतात. कृष्ण राधेत इतका एकरूप होऊन गेला की राधा ही कृष्णप्रेमाचे प्रतिक झाली. ज्यांना कृष्णप्रेमाचे प्रतिक हवं होतं त्यांना त्यांच्या विचारभावनांनुसार केवळ प्रतिकच मिळत गेलं. तर जी राधा प्रेमप्रतिकांच्या मागे न लागता कृष्णमय होऊन गेली होती तिच्या अणुरेणुत कृष्ण विसावला. शेवटी ग्रेस लिहितात - "असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला !" इथं कालिंदीचे नदी आणि पत्नी असे दोन्ही संदर्भ अत्यंत चतुरतेने त्यांनी वापरले आहेत. कालिंदी हे कृष्णाच्या पत्नीचेही नाव आहे अन यमुनेलाही कालिंदी म्हटले जाते. कृष्णभक्ती करणाऱ्या अशा लाखो घटकात, वेगवेगळ्या प्रेम प्रतिकातून कृष्ण लक्षावधीच्या संख्येत अस्तित्वात असेल पण राधेला जो कृष्ण मिळाला तसा कृष्ण कोणालाही मिळाला नाही ! एका कठीण प्रश्नाची उकल अत्यंत सोप्या पद्धतीने ग्रेस इथे करतात. या कवितेतील आशयाइतकीच यातील शब्दरचना आपल्या मनावर आपसूक गोंदवली जाते. हे ग्रेसांचे अन त्यांच्या अद्वितीय प्रतिभेचे यश म्हणावे लागेल. कृष्णशोधाच्या गहन, अध्यात्मिक कार्याचे शब्दधनुष्य त्यांनी लीलया पेललेली एक रचना खाली दिली आहे. त्यात त्यांनी कृष्ण म्हणजे काय, कृष्ण कोणाला मिळतो इथपासून ते राधेचा नेमका अर्थ काय घ्यावा इथपर्यंतची सर्व भाष्ये एकाच कवितेत इतक्या सहजतेने केली आहेत की वाचणारा मंत्रमुग्ध व्हावा. कृष्ण राधेस मिळतो पण इतरांना का मिळत नाही यावर देखील त्यांनी तिरकस कटाक्ष टाकला आहे. "राधेस जो मिळाला तो एकटाच उरला" या पंक्तीने कवितेची सुरुवात करून त्याच पंक्तीने शेवट करताना मधल्या पंचवीस पंक्तीत त्यांनी कृष्णभक्ती कशी असावी याचे मार्मिक उत्तर दिले आहे. राधेस जो मिळाला तो एकटाच उरला! स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने एकदा असाच बळजोरीने आपल्या अंगणात लावून घेतला जीवाला आलेलं पांगळेपणह व्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळू लागले सत्यभामेचा चडफङाट तर झालाच पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ मिळाले नाही ते नाहीच स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वत: मोकळा झाला प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी. कृष्णाने हे पुरते ओळखले असणार म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले! राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे शृंगारणार ? तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार? कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला! ग्रेसांच्या काव्यातून वास्तव, स्वप्न, जाणीव, नेणीव यांचा विलक्षण एकजिनसीपणा जाणवतो. ईश्वर, स्त्रीसंबंधीची शारिर व मानसिक पातळीवरची ओढ, मृत्यूचं आकर्षण आणि भय याभोवती त्यांच्या लिखाणाची मुख्य आशयसूत्रं दिसतात. "दुःख" या अमूर्त जाणिवेचं ग्रेस यांना अबोध आणि गूढ आकर्षण होतं. त्यामुळेच दुःखाशी संलग्न व्याकुळता, भावार्तता, नैराश्य, औदासीन्य, खिन्नता अशा अनेक भावच्छटांनी त्यांची कविता ओथंबून आलेली दिसते. या भावच्छटा ग्रेस यांच्या कवितेत अप्रतिम अशा प्रतिमा घेऊन अवतरतात. दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका। दुःखसुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका॥ या ओळींमधे ग्रेस यांच्या आर्त करुण भाव दिसून येतो. कवी ग्रेस यांच्याविषयी आणि त्यांच्या कवितेविषयी अधिक जाणून घ्यायचेय ? तर मग क्लिक करा खालील ब्लॉगलिंकवर..

165 likes 14 shares
WhatsApp