(लाडक्या मुलीला बेजबाबदारपणे पाळणाघरात सोडून जाणाऱ्या आईला उद्देशून मुलीने केलेली विनवणी गीतातून मांडली आहे) *मज सोडू नको गं आई* दाईत असू ही शकतो ,लपलेला एक कसाई मी लहान असताना तू ,मज सोडू नको गं आई |धृ| उदरात तुझ्या मी जेव्हा, शुन्यातुन वाढत होते नाळेशी जोडलेले ते ,का विसरून गेलीस नाते ती खोटी मग का होती,मज वाढीची नवलाई मी लहान असताना तू ,मज सोडू नको गं आई |1| घे छातीशी लावून मज,ओठांना पिऊ दे सुधा स्वर्गीय हक्क तो माझा ,नको येऊ देऊस बाधा समजून बाल्य बाळाचे,"हिरकणी" अमर ती बाई मी लहान असताना मज,तू सोडू नको गं आई |2| मज भूक नसली तरीही ,सक्तीने खाते शीरा भूक पदराच्या हवेची,पण मिळतो "कुलर" वारा मज खेळू वाटले तरी "ती",झोपण्याचा झोका देई मी लहान असताना तू ,मज सोडू नको गं आई |3| मी होईल जेव्हा मोठी,फेडीन तुझे मी पांग गंध-पावडर लावून माझ्या,केसांचा पाड ना भांग पैशांचे फेकून पुडके,निघण्याची कसली घाई मी लहान असताना तू,मज सोडू नको ग आई |4| डोक्यात तुझ्या सैतानी,स्वप्नांची चढली नशा सोडून मला वाऱ्यावर ,फिरु नकोस दाही दिशा दे गंध तुझ्या श्वासातून,मी फूलेन अलगद जाई मी लहान असताना तू ,मज सोडू नको गं आई |5|
165 likes
70 shares