Back to feed
I
Ishaan Joshi Life · Marathi · Life

शेवटी सांगुनी हे सत्य थकले , स्तब्ध झाले शेवटी … माणसाचा घात करते , कर्म त्याचे शेवटी । निर्मुनि सारे दिले रे , आयते हाती तुझ्या … भूक ना शमते तुझी का , तू उपाशी शेवटी । हे हवे अन ते हवे , हा सोस रोजच वाढतो … हावरेपण नेतसे , तुजला लयाला शेवटी । भौतिकाचा मोह मोठा , सुख मना लोभावते … धावुनी मागे तयांच्या , क्लांत होतो शेवटी । मांडतो मोठा पसारा , जमवितो गोतावळा … ठेवुनी येथेच सारे , जायचे रे शेवटी । येती अन जाती कितीक , हे चक्र अविरत चालते … कैक सुरमा तळपले , गेले लयाला शेवटी । येई सद्दी नित नवी , अन नित्य बदले संस्कृती … माणसाची बुद्धी त्याला , घडविते रे शेवटी । दुक्ख मज प्रगतीचे नाही , काळ हा सोकावतो । नश्वराचा शाप घेवून , चालते जग शेवटी । काय मी समजूत घालू , काय सांगू मी तुला … निर्णयाचा भोगभोक्ता , तू तुझा रे शेवटी ।

15 likes 32 shares
WhatsApp