सांग ना..... ऐन संध्याकाळची कित्ती वेळची कुठे गेलीयेस! साधी कोप-यावर कोथिंबीर घ्यायला जायचीस तरी तू हज्जार शंभर सूचना द्यायचीस, नि मी म्हणायचं,किती सांगते गं मला पाठ आहेस तू ? तू म्हणायचं"कारण माठ आहेस तू "! मग माझ्याकडून ते दरवाजेच उघडे रहाणं,नळाच वहाणं, ठरलेलं आणि तुझंही लटक्या रागानं पहाणं ठरलेलंच! वाटतं कशी ग तू इतकी शहाणी अशी या खुळ्याच्या आयुष्यात आलीयेस, सांग ना ऐन संध्याकाळची किती वेळची कुठं गेलीयेस? पहाटे पाचच्या ठोक्यापासून तुझं ते कामात व्यग्र असणं,धावपळ, धडपड, स्वयंपाक,पाणी,भांडीधुणी, निवडण,निसणं,तरी ते टवटवीत दिसणं, मी निघताना गोड हसणं ! मला कित्ती संवय केलीयेस! सांग ना किती वेळची कुठे गेलीयेस! जेवणाच्या डब्यात भाजी न् पोळी आणि... आठवणीनं कडेलाच ठेवलेली माझी प्रेशरची गोळी "विसरभोळा सांब" लाडानं म्हणायचं, ते आठवून मग पोट आणि ऊर दोन्ही भरायचं!एक सांगू, मला नं तुझ्यासाठी सोन्याची ठुशी घ्यायची असायची पण घराचे हप्ते नि पोराची फि द्यायची असायची! तर म्हणायचीस "अरे,आवडतच नाही मला, ठेवलंय काय त्या ठुशीत,तुझ्या कुशीत खूष आहे रे मी !" वाटायचं आहेसच समजूतदार तू,की निव्वळ माझ्यासाठी झालीयेस ! सांग ना,किती वेळची कुठे गेलीयेस? तू कुठे गेलीस की मला भानच नसायचं, कधी दरवाजा उघडाच रहायचा, कधी दिवाच लावलेला नसायचा, पण अग बघ ना आज मी दिवा ही लावलाय, आणि दरवाजा मुद्दामच उघडाच ठेवलाय, अंधारच ढळतच नाहीये, वात जळतेय पण रात्र टळतच नाहीये, उजेडच येत का नाहीये? हं अग,कारण अजून तू,...तू नाही आलीयेस! कुठे गेलीयेस, अशी ऐन संध्याकाळची किती वेळची,कुठे गेलीयेस? सांग ना.....
0 likes
0 shares