सद्गुरुकृपेशिवाय परमार्थात एक पाऊलदेखील पुढे पडणार नाही. ज्याच्यावर सद्गुरूची कृपा असेल, त्यालाच आत्मसुखाचा लाभ होणार आहे. आत्मानुभवासाठी गुरुकृपेचीच आवश्यकता आहे. उन्मन होणेचा मार्ग गुरुकृपेशिवाय सापडत नाही. कृपा झाल्यावर साधनसिद्धीस वेळ लागत नाही. गुरुकृपेशिवाय जीवनात विश्रांति नाही. गुरुकृपेने न घडणाऱ्या गोष्टी घडतात. गुरुकृपा ही अलौकिक आहे. उपदेश किंवा अनुग्रह हे दोन्ही होण्यास गुरु व शिष्य एकत्र येण्याची आवश्यकता असते. परंतु कृपेचे तसे नाही. कृपा कोठूनही करता येते. गुरु दिल्लीला असो वा शिष्य मुंबईला असो, गुरु तेथून कृपा करू शकतो. सद्गुरु सांगलीला व शिष्य लंडनला असला तरी गुरुकृपा होऊ शकते. सद्गुरूची कृपा काय करते व काय न करते, हे सांगता येणार नाही. देहातीत असणारे गुरु हे देहबाधा असणाऱ्यावर कशी कृपा करणार? चार देहांच्या लाकडी ठोकळयांना जोपर्यंत आपण चिकटून आहोत, तोपर्यंत गुरुकृपेच्या विजेचा झटका बसणे शक्य नाही. सद्गुरूंची कृपा सहजासहजी होत नाही. त्याला खडतर साधनाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. ज्या प्रमाणात साधनाचा अभ्यास त्या प्रमाणात सद्गुरुकृपा होणार. शिष्याने आपली भूमिका बनविली की गुरुकृपा होते. निष्ठेशिवाय गुरुकृपा नाही. ज्यांच्यावर एकदम कृपा झाल्यासारखी वाटते, त्यांनी मागे अभ्यास केलेला असतो. ज्याची पूर्वपीठिका भक्कम आहे, त्याच्यावर एकदमच कृपा होते. गुरुकृपा ही कोणावर, कशी व केव्हा होईल हे सांगता येणार नाही. कृपा असेल तर नामगति व प्राणगति एकच होते. सद्गुरुकृपेने अवस्था बदलली की आपोआप चैतन्याकडे वृत्ति वळते. चैतन्याची खेच सुरू होणे हा गुरुकृपेचा पहिला अनुभव आहे. जीव, नाम व ब्रह्म हे एकरूपच आहेत. परंतु त्यांची ओळख व्हावयास सद्गुरुकृपा पाहिजे. चैतन्याचा अनुभव घ्यावयाचा असेल, तर चैतन्याचे माध्यम सापडले पाहिजे. त्यासाठी सद्गुरूची गाठ पडायला पाहिजे आणि त्याची कृपा व्हायला पाहिजे. गुरुकृपाप्रसादाशिवाय आत्मारामाची प्राप्ति आणि साधन मार्ग यांचे आकलन होणार नाही, हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. *जय गुरुदेव*
126 likes
33 shares