स्वतःची *सही*सुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची वांझ तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा.. A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा.. मॉलमध्ये गेल्यावर "ये कितने का है ?" किंवा "हाऊ मच इट कॉस्टस ?" असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ... आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा.. व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ "कंटाळा येतो म्हणून" विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा.. फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणा-या किंवा टीसी ("काळजी घे" चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा... टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?..त्यांनाही आज शुभेच्छा.. सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यात, बँकेत किंवा ईतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, "मराठीचा किमान एका संधीसाठीही" वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा... वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक - चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा.. फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा... मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा... जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल, तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा वाचून सोडून दया, पण *केवळ औपचारिकता म्हणून किंवा लेखन आवडले म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी, हा शुभेच्छा संदेश पुढे पाठवू नका..* तो अधिकार आपल्याला आहे का याचे आत्मचिंतन करून मगच पुढे पाठवा. *आपण मराठीभाषेचा सिंहनाद करणार आहोत की पिपाणी वाजवणार आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मराठी भाषिक आणि मराठी प्रेमी या नात्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मी केवळ शुभेच्छा देतोय..* *मराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल..* मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो ! 🙏🏻
29 likes
13 shares