स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ चे यशस्वी प्रक्षेपण भारताने ओडिशा येथे सोमवारी पृथ्वी -२ या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. संरक्षण खात्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, पृथ्वी – २ हे क्षेपणास्त्र २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरहून पृथ्वी २ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. सकाळी ९.३५ वाजता एकीकृत परीक्षण केंद्रातील परिसर ३ येथील मोबाईल लाँचरवरुन या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. पृथ्वी २ ला दोन इंजिने आहेत. द्रवरुप इंधनावरही हे क्षेपणास्त्र चालते. तसेच यामध्ये ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. पृथ्वी २ मध्ये जमिनीवरुन जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात अचूक मारा करण्याची क्षमता आहे. आजची चाचणी यशस्वी झाल्याचे डीआरडीओने सांगितले. यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ ला पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले असून, नऊ मीटर लांबीचे एकाच टप्प्यात थेट लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेले अतिशय प्रभावी स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.
236 likes
3 shares