First love/first crush...everybody has one. This poem by Mangesh Vengsarkar is about a man talking with his wife about his childhood love. (Inspired by the movie Ti Sadhya Kay Karte) तू नेहमीच असतेस सोबत तरी कधीकधी ती आठवते. तू आजचा वर्तमान माझा ती भूतकाळात पाठवते. तू व्यापलेल्या हृदयात माझ्या कोपऱ्यात एक जागा उरते. मनाची ती पोकळी विचारते, "ती सध्या काय करते?" शिशुवर्गापासून दहावी पर्यंत फळ्यापेक्षा जास्त तिच्या बाकाकडे पाहिलं. पत्रात मनातलं सगळं लिहिलं होतं मी पण शेवटपर्यंत तिला ते द्यायचंच राहिलं. आजही मुलीला शाळेत सोडताना नजर अलगद त्या बाकांकडे ठहरते. तो रिकामा बाक विचारतो, "ती सध्या काय करते?" पुस्तक-वह्यांची शेवटची पानं तिचं नाव लिहून लिहून भरली. श्रीगणेशा जेवढा नसेल गिरवला त्याहून जास्त तिची आद्याक्षरं कोरली. तिच्या नावाचा उल्लेख होता पटकन एक कविता सुचते. कवितेच्या ओळी मला विचारतात "ती सध्या काय करते?" तिच्या मैत्रीणीला तिचा पत्ता विचारू? नको , उगीच ती मला हसेल. फेसबुकवर असेल का ती? पण तिचं आडनाव आता वेगळं असेल. ती दिसेल या आशेने, माझी गाडी तिच्या जुन्या घराशेजारून फिरते. ती ओळखीची गल्ली मला विचारते "ती सध्या काय करते?" तिने वाढदिवशी वर्गात वाटलेली पेन्सिल कपाटात ठेवली आहे जपून. तिने भरलेले slambook चे पान आजही वाचतो कधीकधी लपून. जुना पसारा रद्दीत नाही टाकत म्हणून आई नेहमी कुरकुरते. अडगळीतल्या आठवणी विचारतात "ती सध्या काय करते?" तिला विचारलं असतं तर हो म्हटलं असतं ? पण हिंमत करून विचारता आलंच नाही. तुला पहिल्याच भेटीत सांगितलं तिच्याबद्दल, तू वागलीस जसं काही झालंच नाही. आता दिवस तुझ्यासोबत सुरू होतो आणि रात्र तुझ्या मिठीत सरते. तू मला कधीच का नाही विचारत "ती सध्या काय करते?"
120 likes
65 shares