Back to feed
I
Ira Das Love · Marathi · Romantic

एक प्रेयसीने आपल्या प्रियकराजवळ मांडलेली भावना प्रधान कविता… . . कधीतरी पहाटे एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी, आणि दचकून उठताना तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी, *यासारखं सुख ते काय?* . कधीतरी भांडताना एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी, आणि ती छोटीशी जखम दिवसभर छळत रहावी, *यासारखं दु:ख ते काय?* . कधीतरी रविवारी सगळं घर पसरलेलं, आणि दुपार नुसतं पडून आळसात घालवावी, *यासारखी मजा ती काय?* . कधीतरी रडताना तू एखादं वाक्य टाकावं, आणि मी रडता रडता हसले की पटकन कवेत घ्यावं, *यासारखा आधार तो काय?* . कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध, आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेतंच समर्थन मिळावं, *यासारखं बळ ते काय?* . कधीतरी चुकताना मला तू वेळोवेळी बजावावं, आणि तू सांगूनही मी चुकल्यावर पुन्हा एकदा समजावून सांगावं, *यासारखं प्रेम ते काय?* . कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं, आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असं वाटावं, *यासारखं समाधान ते काय?* . कधीतरी जगताना जुन्या आठवणींना जागवावं, आणि जे हवं ते सर्व तू दिलंस असं म्हणता यावं, *यासारखं आयुष्य ते काय?*

97 likes 11 shares
WhatsApp