एक प्रेयसीने आपल्या प्रियकराजवळ मांडलेली भावना प्रधान कविता… . . कधीतरी पहाटे एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी, आणि दचकून उठताना तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी, यासारखं सुख ते काय? . कधीतरी भांडताना एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी, आणि ती छोटीशी जखम दिवसभर छळत रहावी, यासारखं दु:ख ते काय? . कधीतरी रविवारी सगळं घर पसरलेलं, आणि दुपार नुसतं पडून आळसात घालवावी, यासारखी मजा ती काय? . कधीतरी रडताना तू एखादं वाक्य टाकावं, आणि मी रडता रडता हसले की पटकन कवेत घ्यावं, यासारखा आधार तो काय? . कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध, आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेतंच समर्थन मिळावं, यासारखं बळ ते काय? . कधीतरी चुकताना मला तू वेळोवेळी बजावावं, आणि तू सांगूनही मी चुकल्यावर पुन्हा एकदा समजावून सांगावं, यासारखं प्रेम ते काय? . कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं, आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असं वाटावं, यासारखं समाधान ते काय? . कधीतरी जगताना जुन्या आठवणींना जागवावं, आणि जे हवं ते सर्व तू दिलंस असं म्हणता यावं, यासारखं आयुष्य ते काय
0 likes
0 shares