कळतच नव्हत मला, माय माझी एकटीच का रडायची | तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची || माझ्या आधीच हात धुवून, रोजच दूर अंधारात बघायची | काय पहात होती कुणास ठाऊक पण, पदराखाली मला घट्ट धरून बसायची || पाऊस नव्हता तरी सुद्धा, माझ्या अंगावर थेंब पडायची | मांडीवर मला थोपटतांना, तिची का झोप उडायची || काहीच नव्हते घरात तरी, ती घराला फार जपायची | एकच होत लुगड तिला, तेच ती धुवून रोज नेसायची || सणावाराच्या दिवशी मात्र, माझ्यावर करडी नजर ठेवायची | जावू नये कुणाच्या घरी म्हणून, मला घरातच लाडीगोडी लावायची || रोजच सकाळी हात जोडून, देवाला काहीतरी मागायची | गालावर हात फिरवून माझ्या, बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची || मातीच्याच होत्या भिंती, पांढर्या मातीनेच लिंपायाची | अंगणात टाकायची सडा नि, घर शेणाने सुंदर सारवायाची || सकाळीही रोजच मला, घासून अंघोळ घालायची | चुलीवरल्या भाकरीचा घास, तिच्या हातानेच भरवायची || शाळेत मला धाडतांना, स्वप्ने मोठमोठी बघायची | सांजच्याला थकायचा चेहरा तिचा, तरी माझ्याकडे पाहून हसायची || कळतच नव्हत मला, आई एकटीच का रडायची | तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची ||
0 likes
0 shares