Back to feed
R
Rudra Yadav Love · Marathi · Romantic

कळतच नव्हतं मला माय माझी एकटीच का रडायची तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची माझ्या आधीच हात धुवून रोजच दूर अंधारात बघायची काय पहात होती कुणास ठाऊक पण पदराखाली मला घट्ट धरून बसायची पाऊस नव्हता तरी सुद्धा माझ्या अंगावर थेंब पाडायची मांडीवर मला थोपटताना तिची का झोप उडायची काहीच नव्हते घरात तरी ती घराला फार जपायची एकच होत लुगडं तिला तेच ती धुवून रोज नेसायची सणावाराच्या दिवशी मात्र माझ्यावर करडी नजर ठेवायची जावू नये कुणाच्या घरी मला घरातच लाडीगोडी लावायची रोजच सकाळी हात जोडून देवाला काहीतरी मागायची गालावर हात फिरवून माझ्या बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची मातीच्याच होत्या भिंती पांढऱ्या मातीनेच लिंपायची अंगणात टाकायची सडा नि घर शेणाने सुंदर सारवायची सकाळीही रोजच मला घासून अंघोळ घालायची चुलीवरल्या भाकरीचा घास तिच्या हातानेच भरवायची शाळेत मला धाडताना स्वप्ने मोठमोठी बघायची सांजच्याला टाकायचा चेहरा तिचा तरी माझ्याकडे पाहून हसायची कळतच नव्हतं मला माय माझी एकटीच का रडायची तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची

0 likes 0 shares
WhatsApp