खरच का रे तुला …….……. ? खरच का रे तुला माझं मन कधीच कळत नाही …….? कि माझ्या मनापर्यंत पोहचण्यइतका वेळच तुला मिळत नाही ? सकाळी उठताच तुझ्या हाती वृत्तपत्र असतं, मला मात्र किचन मधल कामच आधी दिसतं हातात टीव्ही चा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो … मला मात्र सगळ आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो …. सकाळच्या या गडबडीत कधीकधी मला कपभर चहाही मिळत नाही … खरच का रे तुला माझं मन कधीच कळत नाही …….? संध्याकाळी तू ऑफिस मधून दमून घरी येतोस … मलाही तुझ्यासारखच दिवसभर काम असत हे मात्र तू अगदी साफ विसरतोस …… रात्रीचा स्वयंपाक , सकाळीची तयारी माझी नुसती धावपळ सुरु असते …… स्वतः बद्दलही विचार करायला ही मला फुरसत कुठे असते ? तक्रार नाही रे, पण सगळ म्यानेज करताना मला पुरेशी झोपही मिळत नाही … खरच का रे तुला माझं मन कधीच कळत नाही …….? सुट्टीचा दिवस म्हणजे तुझ्या हक्काच्या विश्रांतीचा दिवस असतो … मला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो … त्यातच पाहुणे - मित्र याचं येण , तुझ्यासाठी गेट -टुगेदरची मजा असते …. माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही ओहर टाईम ची सजा असते मला कधीच का हक्काची सुट्टी किंवा एखादी रजाही मिळत नाही …? खरच का रे तुला माझं मन कधीच कळत नाही …….? तू खूप काही मदत करावीस इतकी माझी अपेक्षाच नसते …. वाईट फक्त वाटत जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल , माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते … मला वाटत निदान तुला माझ्या कामाची , ते करण्यामागच्या प्रेमाची जाणीव असावी … आणि थोडी का होईना तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी दिसावी …. समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्यानीच मला आनंद मिळत नाही … खरच का रे तुला माझं मन कधीच कळत नाही …….? कि माझ्या मनापर्यंत पोहचण्यइतका वेळच तुला मिळत नाही .....! - एका पत्नीचं मन 🌹
0 likes
0 shares