गिरिदुर्गांच्या तटबंद्यांना जरा एकदा बिलगून बघ, बुलंद बुरुजांच्या चिलखती चि-यांना फक्त एकदा स्पर्शून बघ. आणि सांग मला, ... शहरी इमल्यांची आठवण येते का? किल्ल्यांवरच्या पठारांवर एकदा रात्री पहुडून बघ, पौर्णिमेचं पिठूर चांदणं स्वतःच्या अंगावर पांघरून बघ. आणि सांग मला, पंचतारांकीत हॉटेल ची आठवण येते का? बाजी-तान्याचे पोवाडे रायगडावरनं गाऊन बघ, देवराईतली राउळघंटा एकदा सांजवेळी वाजवून बघ. आणि सांग मला, डी.जे. च्या धिंगाण्याची ची आठवण येते का? खळाळणा-या झ-यात फक्त जरा बसून बघ, कोसळता धबधबा तुझ्या पाठीवर जरा झेलून बघ. आणि सांग मला, रिसॉर्टमधल्या कृत्रिम धबधब्याची आठवण येते का? कड्यावरच्या ठाकरांकडल्या चहाचे भुरके मारुन बघ, धनगराच्या झापात बसून धारोष्ण दूध पिऊन बघ. आणि सांग मला, पेप्सी, कोक, सेव्हन अप ची आठवण येते का? चुलीवर भाजलेली कांदाभाकरी एकदा जरा चाखून बघ, सारवलेल्या जमिनीवर बसून पळसाच्या पानात जेवून बघ. आणि सांग मला, मॅकडोनाल्डच्या बर्गर ची आठवण येते का? रानांमधनं धावणा-या वाटांवरनं जरा बागडून बघ, मऊ ओल्या हिरवळीवरनं उघड्या पायांनी चालून बघ. आणि सांग मला, इटालियन मार्बलच्या फरश्यांची आठवण येते का? प्रतिष्ठेच्या क्षणभंगूर कवचातून जरा बाहेर येऊन बघ, निसर्गाच्या संगीतावर आयुष्याची बासरी वाजवून बघ. आणि सांग मला, स्वतः ची तरी आठवण येते का ????
188 likes
76 shares