जशी लग्नसराई जवळ आली तशी दागिन्यांची आठवण झाली .....लॉकरची किल्ली शोधली, आणि दागिन्याची पेटी घरी आणली ! पण चोरांच्या भितीने मला, झोपच येईनाशी झाली.... चिंतेने माझी चर्या उतरली, तब्येतही खंगू लागली ! दागिन्याची चमक तशीच होती, मात्र माझ्या चेहर्यावर रंगत नव्हती ... सुंदर दिसण्याचा उपाय साधा आणि परिणाम उलटा, केव्हढी विसंगती होती ! सोन्याचे हे दागिने, मला सुंदर करीत नव्हते... पैशापरी पैसा जाऊन, हाती काहीच लागत नव्हते ! मग मला विरक्ती आली, दागिन्याची आसक्ती संपली... या बाह्य सौन्दर्यापासून आता, मुक्ती हवीशी वाटू लागली ! पण सुंदर दिसण्याचा स्त्रीसुलभ विचार, डोक्यातून काही जाईना... आणि दागिन्याची हौस मनाला, स्वस्थ काही बसू देईना ! मग मी देवाकडे धाव घेतली, म्हणाले, तूच यातून मला सोडव... तू माझा सोनार हो....आणि माझे दैवी दागिने घडव ! चेहर्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना... मुखावर माझ्या कधी न उमटो मनातली विवंचना ! कानासाठी माझ्या घडव, तू असे सुंदर झुबे... माघारीही माझ्याबद्दल, चांगलंच ऐकू येऊ दे ! गळ्याभोवती माझ्या असूदेत, सतत आप्तजनांचे हात... काय करायचेत आता मला, चंद्रहार आणि पोहेहार ? पाटल्या बांगड्या यांनी आजवर, शोभा वाढवली हाताची... आता वेळ आलीय,हात दानतीने खुलण्याची ! वेळोवेळी सजली माझी मेखला कंबरपट्टा यांनी कंबर... आता तिची खरी शोभा, ती ताठ आहे तोवर ! जोडवी अशी जड घडव, की पाय जमिनीवरच राहतील... आता सांग देव सोनारा, हे सारे दागिने केव्हा देशील, दैवी दागिन्याची माझी मागणी , देव सोनारानं नोंदवून घेतली... "जरा वेळ लागेल" अस म्हणत, स्वत:ची भूमिका स्पष्ट केली "अहो ,हे दागिने तयार नसतात, कारण त्यांना तेव्हढी मागणी नसते.. पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत, घेणाऱ्यांच्या,(पैशाची नव्हे) मनाची श्रीमंती वाढावी, एव्हढी माफक अपेक्षा असते ! घडणावळीची काळजी नको, कारण आम्ही ती घेतच नाही.. अहो असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं... यासारखा दुसरा आनंद नाही ! यासारखा दुसरा आनंद नाही !!
103 likes
82 shares