डोह मन बावडी बावडी अंधारला काळ डोह …. नको वाकून पाहूस आत खेचेल रे मोह …॥ डोही भावनांचे जल कधी शांत कधी त्रस्त … ना ना विकारांची भुते दिन रात चाले गस्त …॥ खोल खोल जाऊ नको नाही लागणार थांग …. येती लहरी लहरी घेवूनीया ना ना ढंग …॥ इच्छा आकांक्षांच्या वेली , मनी रुजल्या रुजल्या …. वासनेच्या रानवेली त्यांच्या आधारे सजल्या ….॥ मन चालाख चालाख हळू गारुड घालते गुन्तविते वेल वेल , गुंता वाढवीत नेते …॥ नको नको मारू खडे , उगा उठवू तरंग …. मन सावध हुशार , लपवेल अंतरंग …॥ खळ बळ पाण्यामध्ये , खाली वर झेप घेई … वेल वेल जागी होत उगा हेलकावे खाई ….॥ मन कुटील खेळते , तन वेडात पळते … डोह मोहवितो जीवा , कळूनिया ना कळते …॥ नको फार खेळ करू , खेळ खोटा रे हा सारा … मन डोहखेळवितो थके देहाचा डोलारा …॥ वाकू वाकू जाई देह , ओणावला कठड्याशी … तोल सुटला सुटला , जाई शरण डोहाशी …॥ गुंता झेप घेई वेगे, पडे विळखा देहाला … गुंता सुटता सुटेना देह कलेवर झाला …॥
0 likes
0 shares