*** तू हवी होतीस *** ------------------ पावसाची सर नुकतीच येवून गेली, चमकताहेत पानांवर मोत्याचे थेंब, पाठशिवणीचा खेळ खेळताहेत रंगीबेरंगी फुलपाखरं, निळ्याशार पाण्यात विहार करतेय बदकाची जोडी, प्रेयसीला साद घालतोय नदीकाठचा बेडूक, मधुनच दरवळतोय केवड्याचा सुवास, तुझ्या केसात मादक सुगंध यायचा तसाच.... सारं काही तसच आहे, फक्त तू हवी होतीस !! पहाटेची मंगल वेळ, देवळात सुरू आहे घंटानाद, पसरलाय छान प्राजक्ताचा सडा, सूर्याने चढवली आकाशावर लाली, मधुनच वार्याची झुळूक शहारतेय अंगाला, मंद वातावरणात बासरीचे सूर एकरूप झालेत, दूरवर कुणीतरी गोड आवाजात गात आहे, तू गायचीस माझ्यासाठी प्रेमाने तसच.... सारं काही तसच आहे, फक्त तू हवी होतीस !! संगीताची मैफिल रंगलीय पहाटे पर्यंत, भूप यमन आसावरी मारवा कल्याण भैरवी, उत्तरोत्तर रागांची रंगत चढत गेली, मैफिलीचं वातावरण मंत्रमुग्ध झालय, कुणीतरी भारावून टाकावं तसं, तुझ्या मारव्याच्या गोडव्यासारखं...... सारं काही तसच आहे, फक्त तू हवी होतीस !! केवड्याचा सुवास सुरांचा गोडवा मैफिलीची रंगत सारं काही तसच आहे, फक्त तू हवी होतीस
0 likes
0 shares