पुनश्च का मग होणे परिचय? नभपटलावर तुझ्या चांदणे लुकलुक माझ्या तनामनावर व्योमी तुझ्या नवरश्मि स्वर्णिम प्रकाशमाया माझ्या मनभर.. माझे असणे ति्तुके केवळ दिलास जो प्राणांचा संचय मला आपुल्या ह्या विश्वाचा पुरा उमगला आता आशय तुझा नी माझा आता अजुनी पुनश्च का मग होणे परिचय? स्मित तुझे उदयोन्मुख भास्कर स्पर्श तुझा दवबिंदु फ़ुलावर सौख्य तुझे स्वप्नांच्या गात्री दु:ख तुझे भ्रमरांच्या रात्री नाद तुझा माझ्याशी जुळला कोहम सोहम श्वासांची लय मला आपुल्या ह्या विश्वाचा पुरा उमगला आता आशय तुझा नी माझा आता अजुनी पुनश्च का मग होणे परिचय? रूप तुझे, मी केवळ प्रतिमा रंग तुझे मी तुझा लालीमा गीत तुझे मी शब्द पालवी संगित तुझे, मी फ़क्त आळवी अद्वैताच्या गाठी अपुल्या जरा न कुठले द्वय! मला आपुल्या ह्या विश्वाचा पुरा उमगला आता आशय तुझा नी माझा आता अजुनी पुनश्च का मग होणे परिचय?
0 likes
0 shares