¤ बोला ना हो बाबा खाउ बिउ काही नको, गोष्ट मला सांगा. ऐकेन तुमचे सगळे काही, बोला ना हो बाबा. छोटा आपला गट्टु कसा बब्बा बब्बा करतो. थोडा थोडा उभा राहतो, चालायलाही बघतो. खांद्यावरती एकदा त्याला उचलून तुम्ही घ्याना. ऐकेन तुमचे सगळे काही, बोला ना हो बाबा. केस माझे मीच विंचरेन, नीट बांधून ठेवेन. पाणी आणेन नळावरून, कचरासुद्धा काढेन. नको मला कानामधले, नको नव्या बांगड्या. ऐकेन तुमचे सगळे काही, बोला ना हो बाबा. बोट धरेन तुमचे आणि पिशवीसुद्धा घेईन. रस्त्यात काही मागणार नाही, चालत चालत येईन. कधीतरी मला तुम्ही गार्डनमध्ये न्या ना. ऐकेन तुमचे सगळे काही, बोला ना हो बाबा. किती दिवस झाले, ताई शाळेत गेली नाही. खोकत बसते सारखी सारखी, खात नाही काही. डॉक्टरकडे नेउन तिला औषध तुम्ही आणा. ऐकेन तुमचे सगळे काही, बोला ना हो बाबा. रात्री तुम्ही घरी येता, डोळे असतात लाल. बघून तेव्हा तुमच्याकडे भीती वाटते फार. ओरडु नका आईला नि मारु नका तिला. ऐकेन तुमचे सगळे काही, बोला ना हो बाबा
S
Sahil Bose
Heartbreak · Marathi · Heartbreak
197 likes
32 shares