Back to feed
D
Diya Reddy Love · Marathi · Romantic

*** माझी सखी *** ---------------- सहवासाने प्रेम वाढतं हे खरं आहे, "ती" माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे ! सतत अवतीभवती राहून ती बोलत असते माझ्याशी, मीही मखमली पदर धरून लडिवाळपणे खेळतो तिच्याशी ! फिरतो आम्ही मुक्तकंठाने डोंगर-दर्‍या नदि-नाले रानावनात निसर्गाच्या सान्निध्यात, कधि बेभान होऊन भिजतो पावसात कधी समुद्राच्या लाटेवर स्वार तर कधी रमतो चंद्रलोकी चांदण्यात ! क्षणात इथे तर क्षणात तिथे... कधी डुंबतो आनंदाच्या डोहात तर कधी दु:खाच्या सागरात, कधी दंग होतो जुन्या आठवणीत तर कधी गुंग होतो सुंदर स्वप्नात, कधी फिरून येतो पहाट गारव्यात तर कधी विहारतो खोल अंतर्मनात ! नाही वेळ-काळाचं बंधन... सतत खेळत राहतो पाठशिवणीचा खेळ... कधी रुसुन बसते ती माझ्यावर आणि मी होतो नि:शब्द निरव शांत, विरहानंतर ती येते तेवढ्याच प्रेमाने जवळ आणि मी सुखावून जातो नखशिखांत ! हसत खेळत बागडत असते ती माझ्याबरोबर वेगवेगळ्या रूपात, करतो मी प्रेम तिच्यावर मनापासून कारण ती राहते माझ्या हृदयात ! तुम्हालाही असेल तिला जाणून घेण्याची उत्सुकता, "ती" आहे माझ्या मनातून येणारी सुंदर शब्दात गुंफणारी "माझी कविता"......!!

0 likes 0 shares
WhatsApp