Back to feed
M
Myra Reddy Love · Marathi · Life

वृत्त : विधाता ( हिंदी ) गण : एकूण मात्रा २८ ( १४ १४ ) उपयोगच नव्हता तेव्हा ,सांगून कुणाला काही . . नव्हताच कुणी घेणारा ,ऐकून कुणाला काही ! संपती मुक्याने अपुल्या घाईत रोजच्या भेटी . . आठवे बोलण्यासाठी मागून कुणाला काही. सांत्वनास गेलो म्हणजे सुचती न शब्दही मजला . . हुंदके द्यायला जमते ,मो़जून कुणाला काही ! करताना स्पर्श कळीला , खुपणारच होते काटे . . मग , उगाच का बोलावे , टाकून कुणाला काही ? भरघोस कुणाला मिळते कल्पनेतही नसताना . . जन्मातही न सापडते शोधून कुणाला काही संशयी जगाला नभही ओळखून आहे पुरते . . ते चुकूनही देते का झाकून कुणाला काही ? दिसतात मूळचे डोंगर वेगळेच ज्याला त्याला . . जवळून कुणाला काही . . लांबून कुणाला काही ! गझलकार : वा. न. सरदेसाई

0 likes 0 shares
WhatsApp