साक्रीतल्या सामोडे गावच्या भिलाटीत मोठ्या साहेबाची गाडी, आज दिमाखानं उभी आहे. भूतकाळ हिरीरीनं या भील राजाच्या आठवणी उजाडतोय आणि वर्तमान, त्याच्या कर्तुत्वाचे गोडवे गाण्यात व्यस्त झाला आहे. कारण, उन्हा-तान्हात रानं धुंडाळणारा, मासे-खेकडे पकडणारा राजेंद्र भारुड आज कलेक्टर झाला आहे. भिल्लं….खान्देशच्या पट्ट्यातली आदिवासी जमात.. मोलमजुरी, आणि त्यालाच चिकटून येणारी गरिबी राजेंद्रला वारशातच मिळाली.आईच्या गर्भात असतानाच वडिलांचं छत्र गेलं, त्यामुळे पोरगं जन्माला घालून काय करायचं, हा प्रश्न होता.. मात्र मावशी बायजाबाईनं यावेळी आधार दिला..एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं., अशी या राजा उर्फ राजेंद्र भारुडची यशोगाथा. दारुविक्रीच्या व्यवसायानं फाटक्या संसाराला ठिगळं लावली. मात्र राजेंद्रनं जाणिवांचा पोत कमी होऊ दिला नाही. बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यानं एक-एक पायरी सर केली. राजेंद्र थेट कलेक्टर झाला.राजेंद्रच्या या यशामुळे गल्लीतले लोकांना आज त्याचं कौतुक करताना शब्द अपुरे पडतात.आत्मविश्वास, चिकाटीच्या कथा क्षणभर स्फुरणं आणण्यासाठी ठिक वाटतात. पण, आतड्याला पिळ पडलेला असताना परिस्थिती पालटण्याचा ध्यास जिवंत ठेवणं, हे तेवढंच कठीण.प्रेम करावं, भिल्लासाऱखं.. बाणावरती खोचलेलं, असं म्हणतात. पण आज शिकावं ते या भिल्लासारखं., असं अख्खं साक्री म्हणतंय.
173 likes
17 shares