सुंदर पिचाई ----------------------------- जगभरातील प्रतिष्ठित कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती विराजमान होण्याची परंपरा सुंदर पिचाई यांनी कायम राखली आहे. चेन्नईत जन्मलेल्या पिचाई यांची लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या `गुगल’च्या सीईओपदी नियुक्ती झाली. आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी असलेल्या सुंदर यांच्या रूपाने गुगलला युवा चेहरा मिळालाय. त्यांच्या नियुक्तीमुळे भारतीय बुद्धीमत्तेचा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा गौरव झालाय. . गुगल… इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठीच हे नाव अत्यंत जिव्हाळ्याचं. गुगल हे महाजालावरचं लोकप्रिय सर्च इंजिन. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये मजकूर टाकायचा अवकाश की काँप्युटर स्क्रीनवर हजारो पर्याय दिसू लागतात. अशा या गुगलच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई यांची निवड झाली. पिचाई यांच्या रूपाने गुगलला युवा चेहरा मिळाला आहे. वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी पिचाई यांनी यशाचं शिखर गाठलंय. पिचाई यांची निवड म्हणजे गुगलला पडलेलं `सुंदर’ स्वप्नच म्हणावं लागेल. पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या गुगलला नव्या कल्पनांची, संकल्पनांची गरज आहे. कंपनीने आपल्या व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. वाढत्या लोकप्रियतुळे विस्तारणारा डोलारा सांभाळण्यासाठी गुगलनं `अल्फाबेट’ या नावानं दुसऱ्या कंपनीची स्थापना केली आहे. गुगल आता या अल्फाबेटचा एक भाग असेल. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आता अल्फाबेटचे सीईओ म्हणून काम पाहतील. यामुळे गुगल कंपनीच्या सीईओपदी सुंदर पिचाई यांची नेणूक करण्यात आली आहे. गुगल सर्च इंजिन, गुगल मॅप, यू टय़ूब, अँड्रॉइड यांची सगळी जबाबदारी आता पिचाई यांच्या युवा खांद्यांवर असेल. . पिचाई यांचा जन्म 1972 मधला. त्यांचं मूळ नाव पिचाई सुंदरराजन. त्यांची जडणघडण चेन्नईत झाली. पिचाई यांचं बालपण एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबात गेलं. पिचाई कुटुंब सुरूवातीला दोन खोल्यांच्या छोटय़ा घरात रहात असे. त्यांच्या घरी टिव्हीसुद्धा बराच उशीरा आला. शाळा-कॉलेजला जाताना पिचाई बस किंवा जुन्या स्कूटरवरून प्रवास करत असत. दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी चेन्नईतल्या जवाहर विद्यालयातून पूर्ण केलं. शालेय जीवनात त्यांना खेळांध्ये विशेष गती होती. शाळेच्या क्रिकेट संघाचं कर्णधारपद त्यांनी भूषवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेनं अनेक स्पर्धाही जिंकल्या. त्यानंतर आआयटी मद्रासच्या प्रांगणातील `वनवाणी हायर सेकंडरी स्कूल’मध्ये त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी बी.टेकची पदवी घेतली. सुंदर यांचे इंजिनिअर वडिल आपल्या कामाच्या स्वरूपाबद्दल, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या आव्हानांबद्दल त्यांच्याशी बोलत असत. यामुळे सुंदर यांनाही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रूची निर्माण झाली. . बारा वर्षांचे असताना सुंदर यांना तंत्रज्ञानाची पहिल्यांदा ओळख झाली. त्यांच्या घरी दूरध्वनी आला. दूरध्वनीचं त्यांना फारच अप्रूप होतं. दूरध्वनीमुळे त्यांना अंगच्या एका गुणाची ओळख झाली. सुंदर यांना फिरवलेला प्रत्येक क्रमांक लक्षात रहात असे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीप्रमाणे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक दिसली. ही गुणवत्ता आपल्याला यशोशिखरावर पोहोचवेल, याची कल्पना तेव्हा खुद्द सुंदर पिचाई यांनाही नसावी. भारतात उच्च शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी `मटेरियल सायन्स’ या विषयात मास्टर्स पदवी मिळवली. त्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्तीही मिळाली. यानंतर व्हॉर्टन स्कूलमधून त्यांनी एमबीए केलं. उच्च विद्याविभूषित पिचाई 2004 मध्ये गुगलच्या प्रोडक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष म्हणून कंपनीत रूजू झाले. गुगलमध्ये रूजू होण्याआधी त्यांनी अप्लाइड मटेरियल्स आणि मॅकेन्से ऍंड कंपनीत काम केलं होतं. पिचाई हे लॅरी पेज यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक. गुगल क्रोम ब्राऊझर आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमच्या निर्मितीमागे पिचाई यांची महत्त्वाची भूमिका आहे. कंपनीत रूजू झाल्यानंतर पिचाई यांच्याकडे इतर वेब ब्राऊजर्सच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या गुगल सर्च टूल बारची जबाबदारी आली. पिचाई यांच्याकडे गुगल सर्च टूल बारची जबाबदारी आली तेव्हा गुगलचं स्वतःचं वेब ब्राऊजर लाँचही झालेलं नव्हतं. त्यावेळी मायक्रोसॉफ्टचं इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राऊजर चांगलंच लोकप्रिय होतं. त्यामुळेच एका अर्थानं गुगलच्या जडणघडणीत आणि लोकप्रियतेत पिचाई यांनी मोलाचं योगदान दिलंय असंच म्हणावं लागेल. गुगल टूलबारची जबाबदरी पिचाई यांनी यशस्वीरित्या पार पाडली. गुगल टूलबारला मिळालेल्या प्रचंड यशामुळे पिचाई यांनी कंपनीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. . पिचाई यांच्या बुद्धीची चुणूक दिसू लागल्यानंतर त्यांच्यावर नवनव्या प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली. गुगलचं स्वतःचं वेब ब्राउजर असावं, ही कल्पना पिचाई यांचीच. त्यांची ही संकल्पना गुगलच्या जवळपास प्रत्येक सहसंस्थापकाने उचलून धरली. पण तत्कालीन सीईओ इरिच श्चमिड्ट यांचा या संकल्पनेला विरोध होता. आज ब्राऊजरच्या बाजारपेठेत गुगल क्रोमचा वाटा 32 टक्के आहे. यावरूनच पिचाई यांच्या द्रष्टेपणाची कल्पना यावी. गुगल डेस्कटॉप सर्च, गुगल गियर हे कंपनीचे महत्त्वाकांक्षी प्रकल्पसुद्धा पिचाई यांच्या हाताखाली आकाराला आले. पिचाई यांच्यावर असलेलं गुगलमधल्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाढतच चाललं होतं. गुगल क्रोम ब्राउजर, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम यांच्या यशामागेही पिचाई यांचीच मेहनत आणि प्रयत्न आहेत. गुगल क्रोम ब्राउजरच्या निर्मितीचं काम करणाऱ्या चमूचं नेतृत्व पिचाई यांच्याकडे होतं. क्रोमचं काम साधारण चार वर्षं सुरू होतं. या वेब ब्राऊजरच्या निर्मितीत बराच काळ गेला असला तरी लाँच झाल्यानंतर क्रोमनं धमाकाच केला. झटपट मिळणारी माहिती आणि सुलभ वापर यामुळे अल्पावधीतच गुगल क्रोम हे लोकप्रिय वेब ब्राऊजर बनून गेलं. क्रोमच्या लाटेत मायक्रोसॉफ्टचं इंटरनेट एक्सप्लोरर आणि मॉजिला फायरफॉक्स अक्षरशः वाहून गेलं. क्रोम अस्तित्वात आल्यानंतर एक्सप्लोरर आणि फायरफॉक्स यांना कोणीच विचारेना. स्पर्धेत टिकाव धरू न शकल्याने मायक्रोसॉफ्टला इंटरनेट एक्सप्लोरर बंद करावं लागलं. गुगल क्रोमशिवाय इंटरनेट वापरणाऱ्यांचं पान हलेनासं झालं आणि गुगल क्रोम हे जगातलं सर्वात लोकप्रिय वेब ब्राऊजर बनलं. क्रोमच्या यशाचं श्रेय अर्थातच पिचाई यांचंच. . 2011 मध्ये सुंदर यांना जी-मेलची जबाबदारी मिळाली. यानंतर पिचाई यांची गणना गुगलच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये होऊ लागली. पिचाई यांची गुणवत्ता पाहून त्याच वर्षी ट्विटरनं त्यांना भली मोठी ऑफर दिली. गुगलला सोडचिठ्ठी देऊन ट्विटरमध्ये रूजू होण्याच्या विचारात असतानाच गुगलनं आपल्या या गुणवान आणि बुद्धीमान कर्मचाऱ्याला 305 कोटी रूपये पगाराची ऑफर देऊन स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलं. 2014 च्या ऑक्टोबरमध्ये त्यांना गुगलच्या उत्पादनांचं प्रमुखपद देण्यात आलं. यामुळे पिचाई हे सिलिकॉन व्हॅलीतलं महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व बनून गेलं. गुगलच्या उत्पादनांचे प्रमुख झाल्यानंतर गुगल सर्च, अँड्रॉइड, क्रोम, इन्फ्रास्ट्रक्चर, कॉर्स, ऍप्स आणि गुगल ऍप्स या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर आली. अँड्रॉइड ही आजची सर्वात प्रसिद्ध मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. गुगल उत्पादनांच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांचा उजवा हात अशी ओळख मिळाली. फक्त अकरा वर्षांच्या सेवेनंतर कंपनीच्या सीईओपदी झालेल्या नेमणुकीने पिचाई यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात यावा. 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदासाठी त्यांचं नाव आघाडीवर होतं. पण या पदी भारतीय वंशाच्याच सत्या नाडेला यांची नियुक्ती करण्यात आली. . सुंदर पिचाई यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं आणि सरळ. मितभाषी पिचाई यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायला फारसं आवडत नाही. म्हणूनच गुगल क्रोम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही सुंदर पिचाई हे नाव लोकांना फारसं परिचित नव्हतं. पिचाई यांचा प्रसिद्धीपेक्षाही चांगलं काम करण्यावर जास्त भर आहे. कॉर्पोरेट जगतातल्या बडय़ा व्यक्तिमत्त्वांना लाभणाऱ्या वलयापासून ते चार हात लांबच आहेत. म्हणून गुगलच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतरही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नव्हती. बरंच संशोधन केल्यानंतर पिचाई यांची वैयक्तिक माहिती उपलब्ध झाली आणि त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण भारतात झाल्याचं कळलं. आजघडीला पिचाई हे गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्यानंतर कंपनीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 29.5 लाख कोटी रूपयांची गुगल ही कंपनी आता ते सांभाळणार आहेत. . पिचाई यांची जडणघडण भारतात झाली. लहानपणी त्यांना आणि त्यांच्या भावाला फरशीवरच झोपावं लागत असे. मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवताना विमानाची तिकिटं आणि सुरूवातीच्या खर्चासाठी त्यांच्या इंजिनिअर वडिलांना कर्ज घ्यावं लागलं होतं. मध्यमवर्गीय आयुष्य जगणारा एक भारतीय मुलगा सिलिकॉन व्हॅलीत आपलं स्थान निर्माण करतो. लहान वयातच गुगल या जागतिक स्तरावरच्या नामवंत कंपनीच्या प्रमुखपदी पोहोचतो, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पदच म्हणावी लागेल. एका सामान्य घरातून आणि सामान्य वातावरणातून आलेली व्यक्ती गुणवत्ता, बुद्धीमत्ता आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर यशाचं शिखर गाठू शकते, हेच सुंदर पिचाई यांनी सिद्ध केलंय. पिचाई यांच्या यशामुळे अनेकांना आयुष्याची दिशा गवसेल आणि भविष्यात असे अनेक सुंदर पिचाई घडतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. - मधुरा कुलकर्णी…. --------------------------------------------- source: नवी अर्थक्रांती
D
Diya Kapoor
Motivation · Marathi · Motivation
50 likes
22 shares