*हॅपी वुमेन डे* काही प्रश्न तिचे आहेत, काही प्रश्न माझेही आहेत, तिच्या साऱ्याच प्रश्नांचा निर्माता मी आहे••• आणि माझ्या प्रश्नांचा निर्माताही मीच आहे••• मी स्वतः झालो आहे प्रश्न, आणि मीच आहे प्रश्नकर्ता, मला घरी कोणीही प्रश्न विचारू नये, मी कुणालाही उत्तरदायी नाही, पण तिने द्यायची मला सगळी उत्तरं••• खिशातला रुमाल, कंगवा कुठंय ? इथपासून ते आज कुठं गेली होती ? सोबत कोण होतं ? ऑफिसातून यायला इतका उशीर का ? तिने मान खाली घालून पदराशी चाळा करत द्यायची सगळी उत्तरं निमूटपणे••• तिने वर तोंड करून बोलू नये माघारी••• नाहीतर••• उद्या ऑफिसात तिलाच सांगावं लागेल, दाढ सुजली म्हणून••• दाढा सुजलेल्या बायका बघतो मी माझ्या ऑफिसात सुद्धा••• केवळ प्रश्न उत्तराची ही शाळा नाही, तिने करायचा रोजचा गृहपाठ न चुकता, आणि रात्री जागून कार्यानुभवसुद्धा••• खरं तर ती आवडते मला, तिचं पिलांसाठी घार होणं, संसार सेतू बांधण्यासाठी खार होणं, कधी प्रेमाची जलधार होणं, पण मला खुपतं तिचं वरचढ होणं, खरं तर तिला नाही व्हायचंय वरचढ, तिला तर चालायचं आहे बरोबर••• पण मला भिती आहे, भीतीचीच ही परिणीती आहे••• आता मला प्रश्न सतावतोय, ती शिकली आहे स्वावलंबन ! तिला आलं आहे आत्मभान ! ती झालीय आत्मनिर्भर ! शक्यता आहे ती केव्हांही मला कोलू शकते !! पण अजून तरी ती म्हणते, *"ईश्श••• गडे•••"* म्हणून मी मनापासून म्हणतो, *"हॅपी वुमेन डे•••!"*
160 likes
52 shares