पिकल्या पानाची गोष्ट गोष्ट तशी जुनी नाही. नवीही नाही. विसरू नये अशी आहे. ------ अनेक वर्षे गुरुजींच्या घरी अभ्यास पूर्ण करून विद्यार्थी घरी परत निघाला.गरीबाघराचा होता. न्यायला कुणी येणार नव्हतं. सकाळी गुरुजींना नमस्कार केला. म्हणाला, " गुरुजी, दक्षिणा काय देऊ ? " गुरुजींना कल्पना होती..ते विचारात पडले.. त्यांचा लाडका होता. जिद्दी होता.कष्टाळू होता...आश्रमात आला तेव्हा नेणता होता. आता तरुण होत असलेला, जगाच्या व्यापारात जगण्यासाठी दोन हात करायला समर्थ झालेला चेला मान झुकवून गुरूंच्या शब्दाची वाट पाहात उभा होता.. गुरुजींनी त्याच्या पाठीवर थाप मारली. म्हणाले," जा रानात. मला मुठभर वाया गेलेला पाचोळा आण दक्षिणा म्हणून...जा. " विद्यार्थी रानात गेला. भाताच्या खाचराच्या बांधाला वाळक्या पानांचा ढिगारा लावून ठेवलेला होता. त्यानं पानं उचलली. झोळीत टाकली. रानाचा मालक धावत आला..,"आरं आरं माज्या राज्या, टाक माघारी माजा पाचूळा..माज्या रानातला माल ह्ये त्यो. त्याचा जाळुन राब क्येला की भात अक्षी जोमात उगवतंय बग.."चेल्यानं पानं परत ढिगात टाकली... गुरुजींचे शब्द आठवले. वाया गेलेली पानं.. तसाच चालत राहिला. डोळे उघडे ठेवून सगळीकडे निरखत होता,,कुठं पाचोळा गावतोय...पण वाया गेलेली पानं ?.. एक कावळ्यांची जोडी चोचीत पानं धरून उडत होती. घरट्यात पिल्लांसाठी अंथरूण घालत होती. ओढ्यात वहात वहात पान चाललं होतं.. त्यावर चार मुंग्या भेदरून जीव वाचवत थांबल्या होत्या. एक भलं मोठं पान ओढत मुंग्या वारुळात नेत होत्या... एक पान पिकून गेलं होतं. वाऱ्यावर झुलत होतं..त्यानं तोडायला हात पुढं केला खरा,,पण तो थांबला...त्या पानाच्या मागे नव्या पानाचा एक हिरवा ठिबका वाढत होता..तो किड्यांमुंग्यांपासून वाचवण्यासाठी पिकलं पान अजून तिथं थांबलं होतं..त्या पानांतील कण मुंग्यांनी नेले होते..पानाला जाळी पडली होती. ----- संध्याकाळी दमलेला तरुण मान खाली घालून आश्रमात रिकाम्या हातांनी परतला.. " गुरुजी, रानात एकही वाया गेलेलं पान मला मिळालं नाही...." ---------------------- गुरुजींनी त्याचे दोन्ही हात हातात घेतले. म्हणाले ," मिळाली मला दक्षिणा. जा..जग फार मोठं आहे...तिथं वाया काही जात नाही..कळलं तुला... आता तुला काहीही कमी पडणार नाही. तुला तर देवानं हे दोन हात दिलेत..आणि समज सुद्धा.... !! श्रीराम!!
R
Riya Joshi
Social · Marathi · Social_Awareness
250 likes
84 shares