बुवाबाजी - भाग १४ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून) ========================================= बुवाबाजीचा प्रतिकार कसा करावा - (१) ज्या बुवाबाजीमुळे कोणत्याही कायद्याचा भंग होत असेल अशा बाबतीत कायद्याचा वापर परिणामकारकपणे करावा. मात्र त्यासाठी परिस्थितीबाबत व्यवस्थित पुरावा मिळावयास हवा तसेच त्या संदर्भातील कायदेशीर तर्तुदिचाही नीट अभ्यास करावयास हवा. पोलीस यंत्रणा व प्रसार माध्यमे यांना विश्वासात घेऊन, सोबत बरोबर घ्यावयास हवे. (२) कोणीही बाबा, कसल्याही चमत्कारा चा दावा करत असल्यास, त्याला थेट आव्हान द्यावे, त्यामुळे त्याचा दबदबा कमी होतो. (३) बाबा अथवा त्याचे अनुयायी हिंसक चिथावणी देतात अथवा हिंसक कृत्य करतात जसे नरेंद्र महाराज यांनी जाहीरपणे एन.डी.पाटील, दाभोलकर यांचे हात पाय तोडण्याची धमकी दिली किंवा अंनिसच्या पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली अथवा त्यांचा धर्मदंड विमानतळाच्या नियमाप्रमाणे ताब्यात घेतला म्हणून त्यांच्या अनुयायांनी विमानतळाची नासधूस केली. अशा गोष्टींवर त्वरित परखड प्रतिक्रिया समितीमार्फत तसेच समाजातील मान्यवरांच्यामार्फत द्यावयास हवी. (४) बुवा बाबांच्यामार्फत भरमसाठ दावे केले जातात. जसे रामदेवबाबा योगाच्या साह्याने ताबडतोब प्रचंड प्रमाणात वजन कमी करण्याचा दावा करतो. अशा बाबतीत नियंत्रित चाचणीची गरज सांगून, सातत्याने त्याची मागणी करावयास हवी. (५) बुवाबाजीविरोधात बोलताना ही गोष्ट स्पष्ट करावी की, समितीचा देवाधर्माला विरोध नाही तर देवाधर्माच्या नावाने जे बाबाबुवा शोषण करतात त्याला विरोध आहे. तसेच याबाबत समितीची जी भूमिका आहे ती भूमिका महाराष्ट्रातील संत व समाजसुधारक यांच्याशी अत्यंत सुसंगत आहे. (६) बुवाबाजीविरोधात मांडणी करताना पुढील मुद्द्यांचा समावेश असावा. (अ) शिक्षण संस्था, प्रसार माध्यमे व राजकीय नेते बुवाबाजी विरोधात भूमिका घेत नाहीत. त्यांनी भूमिका घेतल्यास फरक पडू शकतो. (ब) जागतिकीकरणामुळे एक मोठा वर्ग रोजगाराच्या शाश्वतीपासून अस्थिर व वंचित होत आहे. यामुळेही बुवाबाजी फोफावण्यास मदत होते. (क) शारीरिक व मानसिक आरोग्यविषयक अपुऱ्या सुविधामुळे लोकांचे बाबाकडे जाण्याचे प्रमाण वाढते. (ड) जागतिकीकरण, अपुऱ्या आरोग्य सुविधा याबद्दल बुवाबाबा कधीही काही बोलत नाहीत कारण व्यापक परिवर्तनाला त्यांचा विरोधाच असतो. (७) महाराजांकडून मोठ्या प्रमाणात, विविध पातळीवर, स्त्री पुरुष सहजपणे एकत्र येतात. याला पर्याय देणाऱ्या क्रीडा स्पर्धा, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम अशा बाबींचे समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करावयास हवे. (८) बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते याची मांडणी व त्याचे धोके दाखवून करावयाचा प्रतिवाद वरील टिपणीत केला आहे. आध्यात्मिक बुवाबाजीबद्दल विविध प्रश्न नेहमी येणार. त्याबाबत जाणकार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडणी करता यावयास हवी. समाप्त .
S
Saanvi Iyer
Social · Marathi · Social_Awareness
128 likes
55 shares